पाळधी/धरणगाव/जळगाव (प्रतिनिधी) “चांगले वागणे हेच देवत्व आहे, पण कर्म आणि भक्ती कधीही सोडू नका. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे आणि ज्ञानापेक्षा श्रेष्ठ आहे देवाचे ध्यान. हनुमान हे गावाचेग्राम दैवत आहे. अहंकाराचे विष कधीच उतरू शकत नाही. ४० टक्के मुले मोबाईलच्या आहारी गेली आहेत. शाळांमध्ये मोबाईल बंदी आवश्यक आहे. कसाईला गाय आणि दारुड्याला पोरगी देऊ नका. गावाच्या विकासासाठी आणि धर्मासाठी एकजूट आवश्यक आहे. विद्यार्थांनी मोर्चा, आंदोलनांपासून दूर राहा. हसत-खेळत साधेपणाने जीवन जगा” असे एकाहून एक सडेतोड आणि मार्मिक भास्य करून “गावाच्या विकासासाठी आणि धर्म टिकवण्यासाठी एकजूट आवश्यक असल्याचे प्रतिपादन इंदुरीकर महाराजांनी पाळधी येथे आयोजित अखंड हरीनाम सप्ताहात आपल्या प्रभावी कीर्तनातून केले. यावेळी मोठ्या संख्येने भाविक भक्त व युवक यांची उपस्थिती होती.
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या ५ जून रोजी होणाऱ्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या अखंड हरीनाम सप्ताहात इंदुरीकर महाराजांचे दमदार कीर्तन झाले. कार्यक्रमाच्या प्रारंभी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते इंदुरीकर महाराजांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. प्रसंगी ह.भ.प. गजानन महाराज वरसाडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीसह कार्यक्रमासाठी परिसरातील हजारो भाविकांनी उपस्थिती लावली.
कीर्तनादरम्यान इंदुरीकर महाराजांनी आजच्या समाजात निर्माण होत असलेल्या अहंकार, मोबाईल व्यसन, अपप्रवृत्ती, धार्मिक विस्मरण या अनेक विषयांवर सडेतोड भाष्य केले.
इंदुरीकरांनी केले पालकमंत्र्यांचे कौतुक
त्यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटलांच्या साधेपणाचे विशेष कौतुक करत म्हटले, “मंत्री असूनही ते सामान्य वारकऱ्याप्रमाणे खाली बसून कीर्तन ऐकतात, हीच त्यांची खरी उंची आहे. गुलाबराव पाटलांचे खरे वैभव म्हणजे जनतेचे प्रेम आणि त्यांचे प्रामाणिक कर्म.”
कार्यक्रमाचे सुयोग्य व सुक्ष्म नियोजन जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, विक्रम पाटील, जी.पी.एस. मित्रपरिवार व शिवसेना – युवा सेना परिवार यांनी संयुक्तरित्या केले. त्यांच्या नियोजनशैलीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या अखंड हरीनाम सप्ताहाच्या निमित्ताने एकात्मता, धर्मशीलता, सदाचार, आणि ग्रामीण संस्कृती यांचे दर्शन घडले. धर्म सप्ताह म्हणून साजरा होणारा हा कार्यक्रम खऱ्या अर्थाने गावगाड्याच्या आध्यात्मिक उन्नतीचे प्रतीक ठरत आहे.