जळगाव (जिमाका) जळगाव जिल्हा टीबी (क्षयरोग) मुक्त करण्यासाठी जिल्हा आरोग्य विभाग विविध मोहिमा , जाणीव- जागृती करत उत्तम काम करत आहे. आरोग्य विभागाच्या या प्रयत्नास जिल्हावासियांनी सहकार्य करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आज येथे केले.
ऑर्डनन्स फॅक्टरी जळगाव यांच्या वतीने सीएसआर (सामाजिक बांधिलकी) फंडातून टीबी रूग्णांना जीवनावश्यक वस्तूंचे जिल्हाधिकारी श्री.प्रसाद यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन भायेकर, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.देवेंद्र जायभाये आदी उपस्थित होते.
श्री.प्रसाद म्हणाले की,जळगाव जिल्हा टीबीमुक्त करण्यासाठी आरोग्य यंत्रणा अतिशय कष्ट घेत आहे. आशा स्वयंसेविका व आरोग्य सेविका घरोघरी जाऊन क्षयरूग्णांना डॉट्सच्या गोळ्या नियमितपणे देत आहेत. यामुळे रूग्णांचे प्रमाण जिल्ह्यात कमी होत आहे. क्षयरूग्णांसाठी पोषण आहार अत्यंत महत्त्वाचा आहे. प्रोटीन पावडर ही त्यांच्यासाठी महत्त्वाचे आहे.
टीबीमुक्त देश, राज्य व शहर करण्यासाठी आरोग्य विभागाबरोबरच्या आपल्या सर्वांकडून सामुहिक प्रयत्न होणे गरजेचे आहे. असे जिल्हाधिकारी श्री.प्रसाद यांनी यावेळी सांगितले.