शहादा( प्रतिनिधी) : येथील वसंतराव नाईक कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव तसेच वसंतराव नाईक महाविद्यालयाचा क्रीडा विभाग व विद्यार्थी विकास विभाग यांच्या वतीने भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव – मेजर ध्यानचंद जयंती – राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पाच किलोमीटर पुरुष मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते भारत माता व मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमा पूजनानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष सातपुडा शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे सचिव मा. भैय्यासाहेब प्रा. श्री. संजयजी जाधव, सोनानाई शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेच्या सचिव – नंदुरबार जिल्हा स्काऊट गाईड आयुक्त व प्रेमाॅं फाउंडेशनच्या उपाध्यक्षा मा. सौ. वर्षाताईसाहेब जाधव, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मा. काकासाहेब श्री. विनोदजी सोनार, बँक ऑफ महाराष्ट्र, शहादा शाखेचे अधिकारी मा. श्री. मनोजजी नाईक, चि. हिमांशुभाऊ जाधव, सातपुडा शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे समन्वयक मा. श्री. संजयजी राजपूत सर, ज्येष्ठ मॅरेथॉन धावक मा. श्री. सुधाकरभाऊ पाटील, पत्रकार मा. श्री. ईश्वरभाई पाटील डी. एन. ए. मराठी न्यूज चे संचालक मा. श्री. सलाउद्दीनजी लोहार, वसंतराव नाईक महाविद्यालयाचे प्राचार्य मा. प्रो. डॉ. ए. एन. पाटील, महिला महाविद्यालयाचे प्राचार्य मा. प्रो. डॉ. व्ही. एस. पाटील आदी मान्यवरांनी स्पर्धेला हिरवा झेंडा दाखवला.
सदर स्पर्धेत 147 पुरुष स्पर्धकांनी आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदवला होता. यात क्रमशः जगन्नाथ पवार- प्रथम, योगेश पाडवी- द्वितीय, शिवराम पावरा- तृतीय, रमेश पाडवी- चतुर्थ तर धनसिंग पावरा पाचव्या क्रमांकावर येत पुरस्काराचे मानकरी ठरले. या स्पर्धेचे मुख्य वैशिष्ट्य हे की नंदुरबार नगरपरिषद शाळा क्रमांक बारा चे मुख्याध्यापक श्री. करणसिंग उखा चव्हाण यांनी वय वर्ष 48 असतांनाही पाच किलोमीटर उलटे पळत जाऊन ही स्पर्धा संपन्न करून सर्व स्पर्धकांपुढे एक नवा आदर्श ठेवला. मान्यवरांनी त्यांचे कौतुक करून अभिनंदन केले. स्पर्धा संपन्न झाल्यावर लगेचच मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरणही झाले. यावेळी विजेत्यांना रोख रक्कम व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी श्री. हितेशभाऊ सोनार, श्री. कुणालभाऊ सोनार, जायन्ट्स ग्रुपचे अध्यक्ष श्री. सतीश जव्हेरी, माजी सैनिक श्री. गजेंद्रसिंग गिरासे, लोकमत सखी मंचच्या अध्यक्षा सौ. संगीताताई पाटील, जायन्ट्स सहेली ग्रुपच्या अध्यक्षा सौ. सविताताई जव्हेरी, सौ. नलिनीताई सोनार, सौ. किन्नरीताई सोनार, सौ. अलकाताई जोंधळे, सौ. शीलाताई महानुभाव इत्यादी मान्यवर मंचावर उपस्थित होते.
याप्रसंगी स्पर्धकांना मार्गदर्शन करतांना सातपुडा शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे सचिव मा. भैय्यासाहेब प्रा. श्री. संजयजी जाधव म्हणाले की खेळ हा जीवनाच्या अविभाज्य घटक आहे आणि तो व्हावा. त्यामुळे आपल्याला नवी प्रेरणा मिळते. खेळामुळे माणूस खऱ्या अर्थाने तरुण राहतो. सुदृढ शरीरातच सुदृढ मन निवास करू शकते. आजच्या धकाधकीच्या काळात सर्वांनाच व्यायामाची कास धरणे गरजेचे आहे. यासोबतच योग साधने द्वारे आपण आपले मन व शरीर यांचे उत्तम संतुलन राखू शकतो. सर्व विजेत्यांचे व सहभागी स्पर्धकांचे अभिनंदन करून त्यांनी शुभेच्छा दिल्या. या स्पर्धेसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, शहादा नगरपालिका, शहादा यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाची प्रस्तावना महाविद्यालयाचे क्रीडा संचालक प्रा. डॉ. आर. आर. सोनवणे, सूत्रसंचालन विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. डॉ. डी. वाय. पाटील तर आभार प्रकटन प्रा. ए. के. साळुंखे यांनी केले. स्पर्धेच्या संयोजनापासून तर स्पर्धेच्या यशस्वी संपन्नतेसाठी सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर बंधूंनी परिश्रम घेतले.