जळगाव (प्रतिनिधी) पक्षात नुकतीच नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती झाली. माझ्या तालुक्यात नवीन जिल्हाप्रमुख देण्याबाबत मला साधे विचारले देखील गेले नाही. वर्तमानपत्रातील बातमीतून आपल्याला ही माहिती मिळाली. तसेच शासकीय निधि वितरणात देखील पालकमंत्री गुलाबराव पाटील आपणास हेतुपुरस्सर डावलतात, असा आरोप शिवसेनेचे ज्येष्ठ आमदार चिमणराव पाटील यांनी केल्यामुळे शिवसेनेच्या वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.
शिवसेनेचे पारोळा येथील आमदार व जिल्हा बँकेचे संचालक चिमणराव पाटील यांनी पक्षातील नाराजी आज पहिल्यांदा बोलून दाखवली आहे. ते म्हणाले, मी गेल्या पंचवीस वर्षांपासून शिवसेनेत आहे. मात्र आता मी आमदार असूनही स्थानिक पातळीवर मला कोणत्याच गोष्टीसाठी विचारात घेतले जात नाही. मी पक्ष सोडून जावे यासाठी मला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह स्थानिक नेते त्रास देत आहेत, असाही गंभीर आरोप त्यांनी केला. आपला वरिष्ठ नेत्यांवर राग नाही. परंतु स्थानिक पातळीवर नेते त्रास देत आहेत. याची माहिती आता आपण वरिष्ठ नेत्यांना दिली आहे. त्यांच्यावर वरिष्ठ नेते कारवाई करतील याची आपण प्रतीक्षा करीत आहोत. आपण कट्टर शिवसैनिक आहोत. आपल्याला कितीही त्रास दिला तरी शिवसेना सोडणार नाही, असेही स्पष्टीकरण आ. चिमणराव पाटील यांनी दिले आहे. तसेच मी ज्येष्ठ आमदार असून स्थानिक पातळीवर माझे मत विचारात घेतले जात नाही. गुलाबराव पाटील यांच्याकडून मला डावलले जाते, ही वस्तुस्थिती असल्याचेही आ. चिमणराव पाटील यांनी म्हटले आहे.