जळगाव (प्रतिनिधी) जम्मू व काश्मीर येथील पहलगाम येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेत महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. यातील चार जणांचे पार्थिव हवाई मार्गे मुंबईला आणण्यात आले.
पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी विमानतळ येथे आलेल्या पार्थिवाला पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली अर्पण केली.
उर्वरित दोन पार्थिव दिल्ली मार्गे पुणे येथे पाठविण्यात येणार असल्याची माहिती जम्मू व काश्मीर प्रशासनाकडून प्राप्त झाली आहे. दिल्ली येथे येणाऱ्या पार्थिवांसोबत असलेल्या नातेवाईकांशी दिल्लीतील राजशिष्टाचार कार्यालयातील अधिकारी सतत संपर्कात असल्याचे त्यांनी सांगितले.
या दुर्घटनेत अतुल मोने, हेमंत जोशी, संजय लेले,दिलीप देसले यांचा पार्थिव आणले आहेत. जखमी झालेल्या चार पर्यटकांशी संपर्क करण्यात आला असून ते सुखरूप असल्याचे सांगितले आहे. जम्मू व काश्मीरमध्ये पर्यटनासाठी गेलेल्या इतर पर्यटकांची माहिती घेतली जात आहे. आतापर्यंत 275 पर्यटकांशी संपर्क साधण्यात आलेला आहे. स्थानिक प्रशासनाच्या सहकार्याने त्यांची निवासव्यवस्था आणि पुढील प्रवासासाठी आवश्यक ते समन्वय केले जात असल्याचेही सांगण्यात आले आहे.