भुसावळ (प्रतिनिधी) ‘हॅपी बर्थडे बच्चू’…म्हणत लहान भाऊला सकाळी शुभेच्छा देणाऱ्या डॉक्टर बहिणीचा शनिवारी रात्री समृद्धी महामार्गाने अपघातात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. ‘फाल्गुनी सुरवाडे (२०, रा. हुडको कॉलनी, महादेवाचा रानमळा, भुसावळ) या भावी डॉक्टरला अपघातात जीव गमवावा लागलाय.
या संदर्भात अधिक असे की, फैजपूर येथे वास्तव्याला असलेला मेढे परिवार हे पाच भावांचे कुटुंब, राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सदस्य सचिव व सेवानिवृत्त विक्रीकर आयुक्त किशोर मेढे यांच्या सर्वात लहान बहिण वंदना सुरवाडे या भुसावळ येथे वास्तव्याला आहेत. पती शिक्षक तर त्यांची एकुलती कन्या फाल्गुनी (२२) व पुत्र हेमराज (१२), असा परिवार आहे. फाल्गुनी ही अकोला येथे दंतवैद्यकीय शिक्षण घेत होती. शनिवारी रात्री अकोला येथून फाल्गुनी ही तिचे वरिष्ठ डॉ. ज्योती क्षीरसागर व त्यांचे वडील भरत क्षीरसागर हे नागपूर येथे कामानिमित्त जात होते.
सेलू तालुक्यातील समृद्धी महामार्गावर रात्री साडेबारा वाजता त्यांच्या कारचा अपघात झाला त्यात दोघे ठार झाले. या अपघाताने सुरवाडे परिवारावर दु:खांचा डोंगर कोसळला आहे. मुलीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर दवाखाना टाकण्यासाठी भुसावळात परिवाराने जागाही घेतली होती. दरम्यान, भुसावळ येथे फाल्गुनी हिच्यावर शोकाकुल वातावरण अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी आई-वडिलांसह नातेवाईकांचा आक्रोश मन हेलावून सोडणारा होता.
हॅपी बर्थडे बच्चू…!
फाल्गुनी हिच्या लहान भाऊ हेमराज याचा शनिवारी वाढदिवस होता. त्यासाठी तिने शुभेच्छा दिल्या होत्या. मोबाईलवर हेमराज याच्या लहानपणीचा फोटोचे स्टेटस ठेवत फाल्गुनीने हॅपी बर्थडे बच्चू म्हणून त्याला शुभेच्छा दिल्या होत्या.