मुंबई (वृत्तसंस्था) पावसाळ्यात बांधकामांवर कारवाई न करण्याचे आदेश नसतानाही ती करण्यात आली. ह्याचा जाब विचारत असताना अभियंता बेजबाबदार पद्धतीने हसल्याने मिरा-भाईंदर पालिकेच्या एका कंत्राटी अभियंत्याला आमदार गीता जैन यांनी मंगळवारी हसणाऱ्या अभियंत्याच्या कानशीलात लगावली. दरम्यान, पीडित कुटुंबाला घरातून बेघर केल्यानंतर अभियंता हसत होता, यामुळे आपण त्याच्या कानाखाली लगावली. याबद्दल मी कुठलीही दिलगिरी व्यक्त करणार नाही. कुठल्याही कारवाईला सामोरं जाण्यास तयार आहे, असे गीता जैन म्हणाल्या.
मिरा रोडच्या पेणकर येथील कक्कड इमारती लगत असणाऱ्या जागेतील एका झोपड्यावर १६ जून रोजी पालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या पथकाकडून कारवाई करण्यात आली. विनवण्या केल्यानंतरही भर पावसात लहान मुलांना आणि गर्भवती महिलेला बळजबरीने घरातून बाहेरकडून पथकाकडून कारवाई करण्यात येत असल्यामुळे पिडीत कुटुंबाने आमदार गीता जैन यांच्याकडे तक्रार केली होती. त्या घरात लहान मुले आहेत, कुटुंब राहात आहे, आणि तुम्ही घर तोडायचं काम करता, तुम्ही माणसं आहात की राक्षस असं म्हणत आमदार जैन यांनी संबंधित अधिकाऱ्यांनी कानउघडणी केली.
पावसाळ्यात बांधकामांवर कारवाई न करण्याचे शासनाचे आदेश असताना पालिकेमार्फत कारवाई का करण्यात आली? असा सवाल केला. एवढेच नव्हे तर हा मुद्दा आपण विधिमंडळात उपस्थित करणार, असे त्यांनी सांगितले. आपण आता का काही बोलत नाही? असा सवाल त्यांनी मनपाचे अभियंता शुभम पाटील व इतर कर्मचाऱ्यांना केला. त्यावर अभियंता पाटील हा बेजबाबदाररित्या हसू लागल्याने जैन यांना राग अनावर झाला.
यावेळी, आमदारांचे शब्द ऐकताना अभियंता शुभम पाटील हे हसत असल्याने आमदार गीत जैन यांचा राग अनावर झाला आणि त्यांच्या थेट कानशिलात लगावली. दरम्यान, पीडित घरातील महिला रडून आम्हाला मारलं, छळ केला, खेचून नेलं, असं सांगत होत्या. त्यावेळी हा इंजीनियर उभं राहून त्या महिलेवर हसत होता. एखादं पिडीत महिलेचा किती अपमान करायचा? एका महिलेचं घर जातंय. त्यामुळे ती रडतेय, अशावेळी हा इंजीनियर हसत होता. पिडीत महिलेचा अपमान झाल्याने मला राग आला. म्हणून मी हात उचलला. पण याबद्दल मी कुठलीही दिलगिरी व्यक्त करणार नाही. कुठल्याही कारवाईला सामोरं जाण्यास तयार असल्याचेही, गीता जैन यांनी माध्यमांना सांगितले.