मुंबई (वृत्तसंस्था) राज्यात डेल्टा प्लसने कहरच केला आहे. डेल्टा प्लसच्या रूग्णसंख्येत सातत्याने वाढ होताना दिसतेय. त्यातच आता मुंबईमध्ये कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे पहिल्या मृत्यूची नोंद झाली आहे. घाटकोपरमधील एका ६३ वर्षीय महिलेचा कोरोना डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे जुलै महिन्यामध्ये मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. डेल्टा व्हेरिएंटमुळे महाराष्ट्रात झालेला हा दुसरा मृत्यू आहे.
घाटकोपरमधील ६३ वर्षीय महिला डेल्टा प्लस पॉझिटिव्ह होती. ही महिला फुप्फुसाच्या गंभीर आजाराने ग्रस्त होती. तसेच कित्येक दिवसापासून अंथरुणाला खिळून होती. शिवाय, ती घरीच ऑक्सिजनवर होती. कोविड पॉझिटिव्ह झाल्यानंतर डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे तिचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. दरम्यान, या महिलेची २१ जुलै रोजी चाचणी करण्यात आली होती. २४ जुलै रोजी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर, २७ जुलै रोजी तिचा मृत्यू झाला. मात्र, पालिकेकडे बुधवारी ११ ऑगस्ट रोजी ती महिला रूग्ण डेल्टा प्लस पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल आला. तत्पूर्वी तिच्या मृत्यूची नोंद कोव्हिड पॉझिटिव्ह अशीच करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर त्यांचा कोव्हिड अहवाल जीनोम सिक्वेसिंगसाठी पाठवण्यात आला होता. जीनोम सिक्वेसिंग अहवालातून त्या डेल्टा प्लस पॉझिटिव्ह असल्याचे निदान करण्यात आले आहे.
महाराष्ट्रातील डेल्टा प्लस रुग्णांची संख्या ६४ वर
दरम्यान, महाराष्ट्रात बुधवारी २० नवे डेल्टा प्लस व्हेरिएंटचे रुग्ण आढळले. यामध्ये मुंबईत ७, पुणे ३, रायगड, पालघर, नांदेड, गोंदियात प्रत्येकी २, चंद्रपूर आणि अकोला येथे प्रत्येकी १ रुग्णाचा समावेश आहे. त्यामुळे राज्यातील डेल्टा प्लस व्हेरिएंटचे रुग्णांची संख्या ६४ वर पोहोचली आहे.