जळगाव (प्रतिनिधी) सुमारे ११ लाख रुपये घेऊन जाणाऱ्या एरंडोल तालुक्यातील फरकांडे येथील कापूस व्यापारी स्वप्नील रत्नाकर शिंपी खून प्रकरणात आज आणखी एका संशयित आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. त्यामुळे या गुन्ह्यातील आरोपींची एकूण संख्या ७ झाली आहे. दरम्यान, पोलिसांनी ताब्यात घेतलेला संशयित आधीच अटकेत असलेला पोलीस कर्मचारी नटवरचा भाचा असून दोघांनीच लुटमारचा सगळा प्लॅन बनवला असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.
सातव्या आरोपीला चौकशीअंती घेतले ताब्यात
फरकांडे येथील कापूस व्यापारी स्वप्नील रत्नाकर शिंपी यांची कार पाळधी पेट्रोल पंपाजवळ २६ नोव्हेंबरला रात्री ८ वाजेच्या सुमारास तीन दुचाकीवर आलेल्या चौघांनी अडवत चाकूने भोसकून खून केला होता. या प्रकरणी १) नटवर किशोर जाधव (वय ३९ वर्षे रा. शिवकॉलनी, शिरुडनाका अमळनेर ता अमळनेर जि.जळगाव) २) कुणाल उर्फ बंटी सदाशिव वाणी (वय ४० वर्षे रा. चौगुले प्लॉट शनिपेठ, जळगाव), ३) विक्रम राजु सारवान (वय ३२ वर्षे रा. गुरु नानक नगर, शनिपेठ जळगाव) ,४) अंकुश किसन गवळी (वय ३६ वर्षे रा. गवळीवाडा, शनिपेठ, जळगाव) , ५) सनी धर्मराज पवार (वय २३ वर्षे रा. गुरुनानक नगर, शनिपेठ जळगाव), ६) अशोक जगदीश प्रजापत (वय २९ वर्षे रा.प्रजातप नगर, मुमुराबादरोड, जळगाव) या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करत सर्वाना अटक करण्यात आली आहे. यातील नटवर जाधव हा पोलीस कर्मचारी असून तोच या गुन्ह्याचा मास्टर माइंड असल्याचे पोलीस तपासात आधीच समोर आले आहे. दरम्यान, धरणगाव पोलिसांनी आज शशी पवार (वय. ३६ रा. श्रद्धा नगर, जळगाव) याला आज चौकशीअंती ताब्यात घेतले आहे. शशी महापालिकेचा कर्मचारी असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. तसेच त्याला उद्या कोर्टात हजर केले जाण्याची शक्यता आहे.
मोबाईलमुळे गोत्यात आला शशी
नटवर जाधव हा पोलीस कर्मचारी असून तोच या गुन्ह्याचा मास्टर माइंड असल्याचे पोलीस तपासात आधीच समोर आले आहे. दरम्यान, धरणगाव पोलिसांनी आज शशी पवार याला ताब्यात घेतले असून शशी हा नटवरचा नात्याने भाचा असल्याचे कळते. पोलिसांनी जप्त केलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये जळगाव शहर पोलीस स्थानका जवळील पार्किंगमधील सीसीटीव्ही फुटेजनुसार नटवर आणि शशी एकत्र होते. हे दोघंच या गुन्ह्याचे मुख्य सूत्रधार असल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात आता समोर येत आहे.
शशीने केली मोबाईलची व्यवस्था आणि मदतीला दिले दोन जण
पोलीस तपासानुसार नटवरला प्रजापतने टीप दिल्यानंतर तो आपला नात्याने भाचा असलेल्या शशीला भेटला. त्यानंतर शशीने त्याचे मित्र सनी आणि विक्रमला या गुन्ह्यात आपल्या मामा अर्थात नटवरला मदत करण्यास सांगितले. तसेच विक्रमकडे बांभोरीजवळ आपला मोबाईल दिला. त्यानंतर शशी घरी गेला तर इतर चौघांनी स्वप्नील शिंपी यांचा पाठलाग करायला सुरुवात केली. पाठलाग करत असतांना आरोपी मोबाईलवर सतत एकमेकाच्या संपर्कात होते. पोलिसांनी पद्धतशीरपणे मोबाईचा डाटा गोळा करत आरोपींच्या मुसक्या आवळल्या.
विक्रम आणि शशी असे आले गोत्यात
शशी आणि विक्रम हे एकमेकाला ओळखतात. विक्रम आणि सनी ज्या दुचाकीवरून घटनास्थळी पोहचले होते. ती दुचाकी दुसऱ्याची होती. पोलिसांनी संबंधित दुचाकी मालकाला शोधून काढले. दुचाकी मालकाने आपण दुचाकी सनी आणि विक्रमला दिली असल्याचे सांगितले. तर विक्रमने मला शशीने मोबाईल दिला होता, असे चौकशीत सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अशा पद्धतीने विक्रम आणि शशी टप्प्या-टप्प्याने गोत्यात आले. या गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या तीन मोटारसायकली देखील पोलिसांनी जप्त केल्या आहेत. त्यात फिर्यादीत नमूद असलेली होंडा युनिकॉन मोटारसायकलचा देखील समावेश आहे. तर गुन्ह्यात वापरलेले हत्यार अर्थात चाकू देखील पोलिसांनी जप्त केला आहे.
काय होती नेमकी घटना?
जळगाव येथून हवाल्याचे सुमारे १५ लाख रुपये घेऊन जाणाऱ्या एरंडोल तालुक्यातील फरकांडे येथील कापूस व्यापारी स्वप्नील शिंपी यांची कार पाळधी पेट्रोल पंपाजवळ शुक्रवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास तीन दुचाकीवर आलेल्या चौघांनी अडवली. दुचाकीस्वाराला त्यांच्या कारने उडवल्याचा बहाणा करून पैशांची बॅग हिसकावून नेण्याचा प्रयत्न केला. व्यापाऱ्याने पैशांच्या बॅगेवरील स्वत:ची पकड सैल होऊ न दिल्यानंतर हल्लेखोरांनी त्यांच्या मांडीवर, पोटावर चाकूने वार केले. तशाही अवस्थेत व्यापाऱ्याने महामार्गावर जोरात पळत बचावाचा प्रयत्न केला. व्यापाऱ्यासह त्याच्यासोबतच्या कामगाराने प्रतिकार केल्यानंतर हल्लेखोर पैशांची बॅग सोडून पळून गेले. जखमी व्यापाऱ्याला तातडीने रुग्णवाहिकेत खासगी रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी मृत घोषित केले होते.
तपासधिकारी पो.नि. शंकर शेळके यांनी मांडले होते प्रभावी मुद्दे
पोलिसांनी आरोपींना ७ दिवसांची पोलीस कोठडी मिळावी म्हणून तपासधिकारी पो.नि. शंकर शेळके यांनी स्वत: न्यायालयासमोर मुद्दे मांडले होते. तसेच बचावपक्षाचे मुद्दे खोडून काढले होते. आरोपींच्या मोबाईल सीडीआरमधून महत्वपूर्ण माहिती मिळू शकते, असे सरकारी पक्षाचे म्हणणे होते. त्यावर बचाव पक्षाने मोबाईल सीडीआर काढण्यासाठी पोलीस कोठडीची गरज काय?, असे सांगितले. त्यावर तपासधिकारी पो.नि. शेळके यांनी सीडीआर आधीच काढलेला आहे. परंतू कोणत्या आरोपीला कुणाचा फोन आला किंवा त्याने कुणाला फोन लावला? याची माहिती स्वत: आरोपीच देऊ शकतो. त्यामुळे पोलीस कोठडी गरजेची असल्याचे न्यायालयाला सांगितले. तर ओळख परेडमध्ये चारच आरोपींना ओळखण्यात आल्यामुळे उर्वरित दोन आरोपींच्या पोलीस कोठडीची गरज नाही. यावरही तपासधिकारी पो.नि. शेळके यांनी सांगितले की, ओळख परेडशी पोलिसांचा काहीही संबंध नाही. त्याचा अहवाल अद्याप आमच्याकडे आलेला नाहीय. तसेच मूळ फिर्यादीत चार आरोपी होते. त्यानंतर इतर दोन आरोपी कटात सहभागी असल्याचे निष्पन्न झाले आहेत. त्यामुळे अगदी वाढीव कलमांची परवानगी न्यायालाकडून घेण्यात आली आहे. दरम्यान, तपासधिकारी म्हणून पो.नि. शंकर शेळके यांनी न्यायालयात आरोपींच्या पोलीस कोठडीसाठी न्यायालयासमोर मांडलेल्या मुद्यांची कोर्टाच्या आवारात एकच चर्चा झाली होती.
















