अमरावती (वृत्तसंस्था) चांदूर रेल्वे मार्गावरील एसआरपीएफ वसाहतीजवळ असलेल्या वळणावर दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे.
हा अपघात रविवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास घडला. तेजस शरदराव शेंद्रे (२४ रा. वडगाव माहोरे ) व अर्जून मोहन मोहोकार (१८, परिहारपुरा, वडाळी) अशी मृत दुचाकीस्वारांची नावे आहेत. याचवेळी अन्य एक जखमी झाला आहे. त्यांना अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच रुग्णांच्या नातेवाइकांनी रुग्णालयात एकच गर्दी केली होती. दोन्ही दुचाकी वळणावर परस्परासमोर भिडल्या. त्यामुळे दुचाकीवरील तिघेही दुचाकीसह रस्त्यावर कोसळले. अपघातातील दोन्ही दुचाकींचा चेंदामेंदा झाला आहे.