नवी मुंबई (वृत्तसंस्था) कपडे धुण्यासाठी तळ्यावर गेलेल्या आईचा मुलासह तळ्यात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना उरण तालुक्यातील पिरकोनमध्ये रविवारी सायंकाळी घडली. नीरा जगदीश पाटील वय (25 वर्ष), रिहान जगदीश पाटील वय (7 वर्ष) अशी मृतांची नावं आहेत.
पिरकोनमध्ये राहणाऱ्या निरा पाटील (२५) या मुलगा रिहान पाटील (७) याला घेऊन तळ्याकाठी कपडे धुवण्यासाठी गेल्या होत्या. या वेळी त्या कपडे धुवत असताना रिहानचा पाय घसरला व तो पाण्यात पडला. रिहान पाण्यात पडल्याचे पाहून त्याला वाचवण्यासाठी आईनेही पाण्यात उडी मारली व रिहानला हाताशी घेतला. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने निरा पाण्यात ओढली गेली व ही महिला मुलासह तळ्यातील पाण्यात बुडाली.
संध्याकाळी ५ वाजण्याच्या सुमारास कपडे धुवण्यासाठी गेलेले नीरा व त्यांचा मुलगा रिहान संध्याकाळी साडेसात वाजले तरी घरी परत न आल्याने त्यांचे सासरे हे तळ्याकाठी पाहण्यासाठी आले, त्यांना तळ्याकाठी ध्रुवण्यासाठी आणलेले कपडे व चपला दिसल्या. मात्र, निरा व रिहान काही दिसले नाहीत. त्यामुळे त्यांनी आजूबाजूला शोध घेतला, त्यानंतर तळ्यात तर बुडाले नसतील ना? अशी शंका त्यांच्या मनात आली व त्यांनी आरडाओरडा सुरू केला. त्यांचा आरडाओरडा ऐकून ग्रामस्थ तळ्याकाठी आले व त्यांनी तळ्यात शोध घेतला. ग्रामस्थ तळ्याकाठी आले. त्यांनी शोध कार्य सुरू करताच काही वेळात नीरा आणि त्यांचा मुलगा रिहान दोघांचेही मृतदेह आढळून आले.