जळगाव (प्रतिनिधी) शहरातून दिवसभर होणारी अवजड वाहनांची वाहतूक डोकेदुखी ठरत आहे. या अवजड वाहनांना प्रवेशाविषयी काढण्यात आलेल्या अधिसूचनेवर हरकती मागविण्यात आल्या होत्या. त्यानंतर सकाळी ११ वाजेपर्यंत अवजड वाहनांना बंदी राहणार आहे. तसेच प्रस्ताविक वेळेत बदल करुन सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत शहरातून अवजड वाहनांना प्रवेश राहणार आहे.
शहरातील काही मार्गावर वाहतूक व्यवस्थेविषयी नियमावली ठरवून दिलेली आहे. तसेच अवजड वाहनांना प्रवेशासंदर्भातही वेळ ठरवून देण्यात आली आहे. गेल्या आठ वर्षांपूर्वी काढलेल्या अद्यादेशानुसार बाजारपेठेत मालाची वाहतुक करणाऱ्या वाहनांना सकाळी ११ ते दुपारी ४ व रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत परवानगी देण्यात आली होती. मात्र दिवसेंदिवस वाढती वाहनांची संख्या, रहदारी तसेच शाळा परिसर, शासकीय कार्यालय, रेल्वे स्थानक, मुख्य बाजारपेठ, सरकारी व खासगी रुग्णालय, बँका, मोठ्या प्रमाणात नागरी वस्ती यांचा विचार करून वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यासंदर्भात नवीन अधिसूचना काढली होती व त्यावर हरकती मागविल्या होत्या.
शाळा, व्यापाऱ्यांच्या हरकतीनंतर वेळेत बदल
अधिसूचनेत मालवाहू वाहनांसाठी अजिंठा चौक ते नेरी नाका, टॉवर चौक, शिवाजीनगर उड्डाणपूल यामार्गावर सकाळी ९ ते दुपारी ३ तसेच रात्री ९ ते सकाळी ६ या वेळेतच मालवाहू वाहनांना प्रवेश दिला जाणार असल्याचे नमूद होते. सकाळची प्रस्तावित वेळ बदल करीत अवजड वाहनांसाठी सकाळी दोन तास कमी करून ९ ऐवजी ११ वाजेपासून प्रवेश राहणार आहे.
आठ वर्षांपुवीच्या अधिसूचनेची अंमलबजावणी
मात्र नंतर दुपारी प्रस्तावित ३ वाजेऐवजी ४ वाजेपर्यंत अवजड वाहनांना प्रवेश दिला जाणार आहे. तसेच रात्रीच्या प्रस्तावित ९ ते सकाळी ६ या वेळेत कोणताही बदल न करता ती वेळ कायम ठेवली आहे. मात्र आठ वर्षांपूर्वीच्या अधिसूचनेतील रात्री १० वाजेपासून असलेली परवानगी आता ९ वाजेपासून मिळाली आहे.
वर्दळीमुळे सकाळी ११ पर्यंत बंदी कायम
अधिसूचनेत सकाळी ९ ते दुपारी ३ अशी वेळ प्रस्ताविक केली होती. मात्र सकाळी अनेक शाळा, महाविद्यालय, बँका व इतर कार्यालयात येणाऱ्या जाणाऱ्यांची १० वाजेनंतरही वर्दळ असते, असे काही मुद्दे हरकतींच्या माध्यमातून मांडण्यात आले. त्यामुळे सकाळी ११ वाजेपर्यंत अवजड वाहनांना बंदी कायम ठेवली आहे.
व्यापाऱ्यांना १ तास दिला वाढवून
सकाळची वेळ कमी केल्याने व दुपारी एक वाजेपासून एक ते दोन तास बाजारपेठेत जेवणाची वेळ असल्याने ११ ते दुपारी ३ एवढ्या कमी वेळेत मालाची वाहतुक करणे शक्य होणार नसल्याचे व्यापाऱ्यांनी हरकतीद्वारे सांगितले. त्यामुळे दुपारी ३ ऐवजी ४ वाजेपर्यंत अवजड वाहनांना एक तास वाढवून देण्यात आला. यासाठी हरकतींचा विचार करीत सुधारीत अधिसूचना काढण्यात आली.