यवतमाळ (वृत्तसंस्था) नेताजींबद्दल बोलत असताना राज्याचे ऊर्जामंत्री यांनी यवतमाळच्या वणी येथील कार्यक्रमात आरएसएसचे तत्कालीन सरसंघचालकांवर एक मोठी टीका केली आहे. राऊत यांनी केलेल्या दाव्यानुसार तत्कालीन सरसंघचालक हेडगेवार नाशिकमध्ये मुक्कामी असताना त्यांनी सुभाषचंद्र बोस यांची भेट नाकारली होती. ब्रिटिशांच्या भीतीने ही भेट नाकारल्याचंही राऊत म्हणाले आहेत.
ते म्हणाले की, “हेडगेवार नावाचे सरसंघचालक नाशिकमध्ये मुक्कामी होती. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आपल्या खासगी सचिवाला निरोप देऊन नाशिकला त्यांच्या भेटीला पाठवलं. त्या खासगी सचिवाने हेडगेवारांच्या माणसाला भेटायचं असल्याचं सांगितलं. खासगी सचिव दारात उभे असताना, ती व्यक्ती आतमध्ये जाऊन हेडगेवारांना सांगते की तुम्हाला नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याकडून निरोप आला आहे. त्यांचे खासगी सचिव आले आहेत”.
पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, “यावेळी हेडगेवार आपण आजारी आहोत, भेटायचं नाही असं सांगण्यास सांगतात. मी जर आज त्यांना भेटलो तर ब्रिटीश आमच्यासोबत काय करतील…कदाचित जेलमध्ये टाकतील. हे सगळं तो गृहस्थ बाहेरुन ऐकत होता. तर हे असे गुलाम लोक आज आपल्याला शिकवू लागले आहेत. दुर्दैवाने विचारसुद्दा इतके विषारी झाले आहेत यांनी धर्मा-धर्मात, जाती-जातीत तंटे निर्माण केले आहेत”. सरसंघचालक हेडगेवार यांनी १९३० मध्ये यवतमाळ जिल्ह्यात जंगल सत्याग्रह केला. आता करळगाव येथील जंगलात संग्रहालय उभारण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर ऊर्जामंत्री राऊत यांनी वक्तव्य केल्याने नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत.