मुंबई (वृत्तसंस्था) एअरटेल कंपनी मधील दोन कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण केल्याप्रकरणी उच्च पदस्थ अधिकारी अमन मित्तल आणि त्यांचा भाव देवेश मित्तल यांच्या विरोधात रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर मित्तल यांनीही दिलेल्या तक्रारीवरून शिवीगाळ करणे आणि मारहाण करणे या कलमान्वये इंटरनेट सेवा कर्मचारी सागर मांढरे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.
अमन मित्तल हे घणसोली येथे वास्तव्यास असून त्यांच्या घरात इंटरनेटचे कनेक्शन लावण्यासाठी एअरटेलमधील कर्मचाऱ्यांना बोलविण्यात आले होते. यावेळी घरात राऊटर लावूनही इंटरनेट चालू न झाल्याने अमन मित्तल आणि एअरटेलच्या कर्मचाऱ्यांमध्ये वाद झाले. यावाळी एअरटेलचे भूषण गुजर आणि सागर मांढरे यांना बेदम मारहाण करण्यात आली. लोखंडी रॅाड, पियूसी पाईपच्या साहाय्याने ही मारहाण करण्यात आली आहे.
एवढेच मित्तल यांनी चार जणांना बाहेरून बोलवून आपल्याला जबर मारहाण केल्याचा आरोप सागर मांढरे आणि भूषण गुजर यांनी केला आहे. रबाळे पोलीस ठाण्यात अमन मित्तल , देवेश मित्तल यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरीकडे अमन मित्तल यांनी सुध्दा सागर आणि भुषण या दोघांवर मारहाणीचा आरोप केलाय. आपल्याला शिवराळ भाषा वापरून मशीनने तोंडावर मारले असल्याचा गुन्हा रबाळे पोलीस ठाण्यात दाखल केला आहे. दरम्यान, उच्चपदस्थ IAS अधिकारी विरुद्ध गुन्हा दाखल झाल्यामुळे खळबळ उडाली आहे.
















