वर्धा (वृत्तसंस्था) दोन वर्षांपूर्वी हिंगणघाटमध्ये (Wardha Hinganghat) एकतर्फी प्रेमातून तरुण प्राध्यापिकेला जिवंत जाळण्यात आल्याची घटना घडली होती. संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडलेल्या या जळीतकांडप्रकरणी अखेर न्यायालयाने निकाल दिला आहे. आरोपी विकेश ऊर्फ विक्की नगराळे (Vikki Nagrale) याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
विशेष सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम यांनी आरोपी विक्की ऊर्फ विकेश नगराळेला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली होती. मात्र, कोर्टाने विक्की नगराळेला आजीवन कारावास आणि 5 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. आपल्याशी लग्न न केल्यास जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या विक्कीने अंकिताला एकतर्फी प्रेमातून जिवंत पेटवून दिले होते. या घटनेला दोन वर्षे झाली असून अंकिताच्या मृत्यूला आजच (१० फेब्रुवारी) दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे तिच्या दुसऱ्या स्मृतिदिनी लागणाऱ्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. हिॅगणघाट जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालय परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
अॅड. उज्ज्वल निकम यांची प्रतिक्रिया काय?
अंकिताला जाऊन बरोबर दोन वर्षे झाली आहेत. त्यामुळे तिला खऱ्या अर्थाने ही श्रद्धांजली आहे. आज न्यायालयाने आरोपी विकेश नगराळेला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ही मरेपर्यंत जन्मठेप होते. आज न्यायालयाने हे देखील सांगितलं आहे की आरोपी विकेशला ३ फेब्रुवारीला अटक झाली होती. तरी हा दोन वर्षाचा काळ त्या शिक्षेत गृहित धरला जाणार नाही. त्याला आजपासून आजीवन कारावासाची शिक्षा भोगायची आहे. त्याचप्रमाणे ५ हजार रुपये दंडही त्याला द्यायचा आहे. निकालाची पूर्ण प्रत आम्हाला अजून मिळाली नाही. बचावपक्षाला हायकोर्टात जायचं असेल तर निकालाची प्रत वाचून आम्ही पुढील पाऊल उचलू. आम्ही फाशीची मागणी केली होती. मात्र हा अपवादात्मक गुन्हा नसल्याचं न्यायालयाने म्हटलं आणि जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. निश्चितपणे अंकिताला न्याया मिळाला असं म्हणावं लागेल, अशी प्रतिक्रिया विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी दिली आहे.