मुंबई (वृत्तसंस्था) बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला पॉर्नोग्राफी प्रकरणात अटक झाली असून सध्या तो पोलीस कोठडीत आहे. दरम्यान राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पहिल्यांदाच राज कुंद्रा प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. समाजामध्ये जो विषय निषिद्ध आहे, त्यामध्ये जर कोणी चुकीचे वागत असेल तर पोलिसांनी कारवाई सुरू केलेली आहे, असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले.
पुण्यात एका कार्यक्रमासाठी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आले होते. यावेळी राज कुंद्रा प्रकरणी विचारले असता ते म्हणाले की, “समाजामध्ये जो विषय निषिद्ध आहे, त्यामध्ये जर कोणी चुकीचे वागत असेल तर पोलिसांनी कारवाई सुरू केलेली आहे. ही कारवाई एकाच केसपुरती मर्यादित राहणार नाही. तर अशा गोष्टी कशा थांबवता किंवा मर्यादित ठेवता येईल, किंवा यातून कसा मार्ग काढता येईल यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत”.
पेगॅसस प्रकरणावर बोलताना त्यांनी सांगितलं की, “हा विषय एका राज्यापुरता मर्यादित नाही. देशासोबत जगालाही याचा फटका बसला आहे. आम्ही नक्कीच महाराष्ट्रातील वस्तुस्थिती तपासणार असून, ते काम सुरू केलं आहे”.