पुणे (वृत्तसंस्था) आता २०२४ ला काय, आताही राष्ट्रवादीचा मुख्यमंत्रिपद करण्याची तयारी आहे. मी आताच मुख्यमंत्री होणार आहे, असं सूचक वक्तव्य विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केल्यामुळे वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आहे. ते पुण्यात सकाळ माध्यम समूहाच्यावतीने आयोजित अजित पवार यांची ‘दिलखुलास दादा’ ही प्रकट मुलाखतीत बोलत होते. अर्थात त्यांच्या या वक्तव्यानंतर संपूर्ण सभागृहात एकच हशा पिकला होता. दरम्यान, शिंदे गटाच्या गाड्या गुजरातमध्ये कशा गेल्या?, याबाबत अजित पवारांनी मोठा गौप्यस्फोट केला.
…तर तेव्हा आर.आर.पाटील मुख्यमंत्री झाले असते !
राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्रीपदाचं अजिबात आकर्षण नाही. 2004 ला मुख्यमंत्रीपद मिळेल, एवढे आमदार निवडून आलेले होते. परंतू राजकारणात काही निर्णय घेतले जातात. काँग्रेसनेही त्यावेळी मानसिकता केलेली होती. परंतु दिल्लीत काय घडलं माहिती नाही. विधिमंडळाचा नेता म्हणून आर. आर. पाटील यांची निवड केली होती. त्यामुळं मुख्यंमत्रीपद जर राष्ट्रवादीनं घेतलं असतं तर त्यावेळी ते मुख्यमंत्री झाले असते. परंतु राजकीय जीवनात काम करताना काही निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतले जातात आणि ते निर्णय पक्षाची शिस्त राहण्यासाठी ते सांगतील तसं ऐकावे लागते. दरम्यान, मुलाखतीत 2024 ला मुख्यमंत्रीपदावर तुम्ही दावा करणार का? असा प्रश्न अजित पवार यांना विचारला गेला. त्यावेळी त्यांनी 2024 ला कशासाठी? आताच करणार, असं म्हणत अजित पवार यांनी मोठं वक्तव्य केलं. रॅपिड फायर राऊंडमध्ये त्यांना मुख्यमंत्री व्हायला आवडेल का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी होय मला मुख्यमंत्री व्हायला आवडेल, असं वक्तव्य करत राजकीय वर्तुळात जणू खळबळच उडवून दिली.
शिंदे गटाच्या गाड्या गुजरातमध्ये कशा गेल्या?,अजित पवारांनी केला मोठा गौप्यस्फोट !
ठाणे जिल्ह्यात कोण अधिकारी असावेत? हे ठरवण्याचा सर्व अधिकार उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना दिला होता. त्यामुळे तेथील पोलीस आयुक्त, ठाण्याचे आयुक्त किंवा तेथील सहा नगरपालिकांचे आयुक्त, ग्रामीणचे एसपी वगैरे नेमण्याचा सगळा अधिकार एकनाथ शिंदेंना दिला होता. त्यामुळे एकनाथ शिंदे हे २० जून रोजी जेव्हा बाहेर पडले, तेव्हा त्यांनीच नेमलेल्या अधिकाऱ्यांनी त्यांना सुरतला सुरक्षितपणे पोहोचवण्याचं काम केलं. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी (उद्धव ठाकरे) संबंधित अधिकाऱ्यांना सांगितलं की, शिंदे गटाच्या गाड्या जिथे असतील, तिथून त्या गाड्या परत वळवा आणि त्यांना मातोश्रीवर आणा. पण अधिकाऱ्यांच्या नियुक्तीवर उद्धव ठाकरेंनी सही केली असली तरी त्या सह्या करून घेण्याचं काम एकनाथ शिंदेंनी केलं होतं. त्यामुळे सगळे अधिकारी एकनाथ शिंदे यांच्याशी एकनिष्ठ राहिले. शिंदे गटाच्या सगळ्या गाड्या पद्धतशीर बाहेर पडल्यानंतर अधिकारी म्हणाले, “अजून कुठे काही दिसत नाही”, अशाप्रकारे हे सगळं घडलं. त्यानंतर, सुरत-गुवाहाटी-गोवा हे सगळ्यांना माहीतच आहे,” असा खुलासा अजित पवारांनी केला.