वर्धा (वृत्तसंस्था) एका धावत्या कारला बळजबरीने रोखत तिच्यातून तब्बल साडेचार कोटींची सशस्त्र लुट करण्यात आली. हा सिनेस्टाईल थरार राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७ वर बुधवारी सायंकाळी घडला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
तक्रारदार अठ्ठेसिंग भगवान सोळंके (४२ मूळ रा. पाटण जि. गुजरात ह.मु. नागपूर) यांनी वडनेर पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रार दिली आहे. त्यानुसार ते एका गुजरातच्या कंपनीचे मागील दोन महिन्यापासून नागपूर शाखेला वाहन चालक म्हणून काम बघतात. त्यांना गुजरातच्या कंपनीच्या मालकाने साडेचार कोटींची रोख रक्कम नागपूरहून हैदराबादला पोहोचविण्यास सांगितले होते. त्यानुसार अठेसिंग हे बुधवारी दुपारी चार वाजताच्या दरम्यान आपल्यासोबत एका सहकाऱ्याला घेऊन चारचाकी वाहनाने राष्ट्रीय महामार्ग क्र. ७ ने हैदराबादकडे निघाले. पोहण्याजवळ ते सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान पोहोचले.
तेवढ्यात मागून भरधाव आलेल्या एका चारचाकी वाहनाने तक्रारदाराचे वाहनाला सतत हॉर्न वाजवून लक्ष वेधले व आपली चारचाकी वाहनाच्या बाजुला घेत त्याला थांबण्याचा इशारा केला. वाहनाचा वेग कमी केला. तितक्यात आरोपींनी तक्रारदाराचे वाहनाला ओलांडून समोरून गाडी आडवी लावली व गाडी थांबविली. क्षणार्धात तक्रारदारांच्या गाडीजवळ पोहोचून समोरच्या अज्ञात आरोपींनी फिर्यादीला शस्त्राचा धाक दाखवत त्यांच्या गाडीतील साडेचार कोटींची रक्कम लुटून पोबारा केला.
सशस्त्र लुटीची ही घटना नागपूर- हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग क्र. ७ वर हिंगणघाटपासून २५ किमी अंतरावरील वडनेर पोलीस स्टेशनअंतर्गत पोहणा शिवारात ६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६.३० च्या दरम्यान घडली. शुक्रवारी गुजरातवरून त्यांचे मालक येणार असून त्यांच्याकडून ही रक्कम कुणाची आहे व कोणाला पोहोचवायला जात होते याची माहिती पोलीस चौकशीतून समोर येणार आहे. दरम्यान, वडनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. तर अवघ्या सात तासांत नागपूरच्या गिट्टी खदान भागातून अलीम, काटोल रोड परिसरातून ब्रिजपाल व नंदनवन भागातून दिनेश या तिघांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची चौकशी सुरू असल्याचे कळते.