जळगाव (प्रतिनिधी) दोघीही मुलीचं झाल्याने वाईट वाटून विवाहित महिलेचे सासरे हे दारुच्या नशेत शिवीगाळ करीत तर पतीकडून विवाहीतेला मारहाण केली जात होती. दोन मुली झाल्याने पतीसह सासू सासर्यांकडून मानसिक व शारिरीक छळ केल्याप्रकरणी तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, नंदिनी उर्फ सोनाली संदिप पाटील (वय २७) रा. तांदळी ता. अमळनेर या सावखेडा खुर्द येथील माहेरवाशीन असून त्यांचे संदिप मुरलीधर पाटील यांच्यासोबत विवाह झाला आहे. सोनाली यांना दोन मूली झाल्याने वाईट वाटून त्यांचे सासरे मुरलीधर पाटील हे त्या विवाहीतेला दारुच्या नशेत शिवीगाळ करीत तर पतीकडून त्यांना मारहाण केली जात होती. तसेच ननंद व नंदोई हे त्यांच्या घरी येवून मुलीच्या अंगावर ४ तोळे सोने घाला नाही तर तिला नांदायला पाठवू नका असे म्हणत त्या विवाहीतेचा मानसिक व शारिरीक छळ सुरु होता. या त्रासाला कंटाळून त्या विवाहितेने तालुका पोलिसात तक्रार दिली. याप्रकरणी विवाहितेचा पती संदिप पाटील, सासरे मुरलीधर पोलाद पाटील, सासू सुकूबाई पाटील रा. तांदळी ता. अमळनेर नंनद प्रतिभा विजय पाटील, नंदोई विजय बबन पाटील रा. तूरखेडा ता. धरणगाव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास अरुण राठोड करीत आहे.