जळगाव (प्रतिनिधी) धरणगाव तालुक्यातील खर्दे येथील पत्नीच्या हत्येनंतर साप चावल्याचा बनाव करणाऱ्या पतीला जिल्हा न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. घटनेचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसतानाही सरकारी वकिलांनी परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे मांडलेला युक्तिवाद आणि वैद्यकीय अहवालाच्या आधारे याबाबत मंगळवारी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने नामदेव रामा जाधव (रा. खर्दे, ता. धरणगाव) याला जन्मठेपची शिक्षा सुनावली आहे.
नेमकं काय घडलं होतं !
खर्दे येथे ३० डिसेंबर २०२१ ला नामदेव जाधव याचे पत्नी विठाबाईसोबत कोळशाच्या भट्टीसाठी गवत आणण्यावरून वाद झाला. विठाबाई यांनी पतीला शिवीगाळ केली. त्याचा राग येऊन नामदेव याने जवळ पडलेल्या लाकडी दांडक्याने विठाबाईस मारहाण केली. तिचे तोंड बंद होईना, म्हणून तिला जमिनीवर खाली पाडून मातीत तोंड खूपसून मरेस्तव मारहाण केली होती. पत्नी विठाबाई मेल्यानंतर तिला उचलून नामदेव याने साप चावल्याचा बनाव केला. विठाबाईला जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले.
शवविच्छेदन अहवालातून खून झाल्याचे उघड !
डॉ. नीलेश देवराज यांनी शवविच्छेदन अहवालात मृत महिलेचा चेहरा व अंगावर तब्बल १७ जखमा होत्या, तसेच तोंडात माती आढळून आली होती. मृत महिलेला बोथट हत्याराने मारहाण केली. जीव गुदमरून तिचा मृत्यू झाल्याचे म्हटले होते. पोलिस उपनिरीक्षक अमोल गुंजाळ यांच्या फिर्यादीवरून धरणगाव पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. या खटल्याच्या सुनावणी दरम्यान सरकारपक्षाकडून ९ साक्षीदारांचे जबाब न्यायालयाने नोंदविले. सरकारपक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील सुनीलकुमार चोरडीया यांनी बाजू मांडली.