जयपूर (वृत्तसंस्था) काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज राजस्थानच्या जयपूरमध्ये एका रॅलीला संबोधित केले. यावेळी त्यांनी भाजपावर जोरदार हल्ला चढवला. हिंदू आणि हिंदुत्ववादी या दोन्ही गोष्टी वेगळ्या असून हा देश हिंदूंचा होता, हिंदुत्ववाद्यांचा नाही, असे सुनावले आहे. यावेळी त्यांनी मी हिंदू आहे पण हिंदुत्ववादी नसल्याचे म्हटले.
काँग्रेसच्या केंद्र सरकारविरोधातील रॅलीमध्ये राहुल गांधी यांनी भाजपच्या धोरणांवरही टीका केली. यावेळी त्यांनी हिंदू आणि हिंदुत्व यातील फरकही सांगितला. त्यांनी म्हटले की, हिंदू हा सर्व धर्मांना मानतो. तर, हिंदुत्ववादी हा कोणत्याही इतर धर्माला मानत नाही. तो फक्त हिंसाचारावर विश्वास ठेवतो. राहुल गांधी यांनी मी हिंदू आहे, पण हिंदुत्ववादी नाही, असे म्हटले. मी हिंदू असून मी अहिंसेवर विश्वास ठेवतो. महात्मा गांधी हिंदू होते आणि गोडसे हिंदुत्ववादी होते. केंद्र सरकार हे हिंदुत्ववादी असून ते आपआपसात हिंसाचार घडवत आहेत. ही मंडळी सत्तेसाठी काहीही करू शकतात असेही राहुल गांधी यांनी म्हटले.
काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी-वाड्रा यांनी भाजपच्या नेतृत्वातील केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. देशातील जनता महागाईने त्रस्त आहे. तर, दुसरीकडे केंद्र सरकार जाहिरातींवर खर्च करण्यात व्यस्त असल्याची टीका प्रियांका यांनी केली. जयपूरमध्ये आज काँग्रेसच्यावतीने केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात, वाढत्या महागाईविरोधात ‘महागाई हटाओ’ रॅलीचे आयोजन केले होते. यावेळी भाषणात प्रियांका यांनी केंद्र सरकार हे निवडक उद्योगपतींसाठी काम करत असल्याचा आरोप केला.
















