नाशिक (वृत्तसंस्था) भाजपला सोडचिठ्ठी दिलेल्या एकनाथ खडसेंना ईडीने समन्स बजावल्याबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘मी ईडीचा प्रवक्ता नाही’, अशा शब्दांत त्यांनी ईडीवरुन भाजपला घेरणाऱ्यांना टोला लगावला. देवेंद्र फडणवीस आज नाशिकमध्ये आले होते. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधला.
यावेळी प्रीतम मुंडे यांना केंद्रात मंत्रिपद न मिळाल्याने प्रीतम यांच्यासह पंकजा मुंडेही नाराज असल्याची चर्चा आहे, असं फडणवीस यांना विचारण्यात आलं. त्यावर फडणवीस भडकले. तुम्हाला कोणी सांगितलं त्या नाराज आहेत. कृपा करून कारण नसताना त्यांना बदनाम करू नका. भाजपमध्ये सर्व निर्णय सर्वोच्च नेते घेतात. योग्यवेळी निर्णय होत असतात. त्यामुळे मुंडे भगिनी नाराज असल्याचं सांगून त्यांची अकारण बदनामी करू नका, असं फडणवीस म्हणाले.
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे ईडीकडून चौकशी सुरू आहे. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. याबाबत जे काही बोलायचं ते ईडी बोलेल. मी काही ईडीचा प्रवक्ता नाही. कायदा आपलं काम करत असतो. भाजपमध्ये अशा प्रकारे विन्डिक्टिव्ह काम करण्याची प्रथा नाही, असं त्यांनी सांगितलं.