सोलापूर (वृत्तसंस्था) गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येत आहेत. आता पुन्हा एकदा शिवसेनेच्या आमदारानं पक्षाला घरचा आहेर दिलाय. पंढरपूर येथील एका खासगी हॉस्पिटलच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना आमदार शहाजीबापू पाटील यांनी मनातील खदखद व्यक्त केली. तालुक्यात शिवसेनेची केवळ ११०० मतं असूनही मी आमदार झालो. कारण माझ्या विजयात मला भाजपची मोलाची साथ मिळाली, असं ते म्हणाले.
शहाजीबापू पाटील हे सांगोल्यातून निवडून आलेले शिवसेनेचे आमदार आहेत. मात्र, तालुक्यात शिवसेनेची केवळ ११०० मते असूनही मी आमदार झालो, कारण माझ्या विजयात भाजपची मोलाची साथ लाभल्याचे ते सांगतात. तसेच, खासदार रणजित निंबाळकर यांच्यामुळे पुन्हा आपल्याला आमदारकी मिळाली. या निवडणुकीत भाजपचे माझ्यावर २४ तास लक्ष होते. सारखे काही अडचण आहे का विचारायला फोन यायचे असे शहाजीबापू यांनी सांगितले.
सांगोल्यात तब्बल १८ वर्षानंतर पुन्हा आमदारकी मिळताना यंदा भाजपच्या साथीसोबत राष्ट्रवादी आणि शेकाप यांचाही छुपा पाठिंबा मिळाल्याचे गुपित शहाजीबापू यांनी पंढरपूर येथील एका कार्यक्रमात उघड केले. विशेष म्हणजे सांगोला हा दिवंगत शेकाप नेते गणपतराव देशमुख यांचा मतदारसंघ होता. यंदाच्या निवडणुकीत ते स्वत: उमेदवार नव्हते. मात्र, त्यांनी दिलेल्या उमेदवाराच पराभव करत शहाजी पाटील यांनी शिवसेनेच्या तिकीटावर विजय मिळवला आहे. विशेष म्हणजे विजयानंतर शिवसेनेकडून गप्प बसा अशी तंबी देण्यात आल्याचेही पाटील यांनी सांगितले.