जळगाव (प्रतिनिधी) नाथाभाऊ समोर मी एक छोटा कार्यकर्ता आहे. ते मोठे नेते आहेत. त्यांच्या पक्षांतराबाबत मला माहिती नाही. परंतू मला वाटत नाही नाथाभाऊ पक्ष सोडतील, अशी प्रतिक्रिया माजी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिली. ते जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधत होते.
यावेळी गिरीश महाजन म्हणाले की, नाथाभाऊ राष्ट्रवादीत व इतर पक्षात जाण्याबाबत मला माहिती नाही. त्यांच्यासमोर मी एक छोटा कार्यकर्ता आहे. पक्षश्रेष्ठी त्यांच्या नाराजीची दखल घेतील. परंतू मला वाटतं की नाथाभाऊ मुंबईच्या कार्यकारणीच्या बैठकीला उपस्थित होते. त्यामुळे मला नाही वाटत की ते पक्ष सोडतील. तसा विषय राहिला असता तर नाथाभाऊ बैठकीला उपस्थित राहिले नसते. त्यामुळे मला नाही वाटत की नाथाभाऊ पक्ष वगैरे सोडतील. तसेच वरिष्ठांच्या कानावर सगळ्या गोष्टी आहेत.त्यांना कल्पना आहेच आणि त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न करत असतील, असेही श्री. महाजन म्हणाले. तसेच खडसेंसह जिल्ह्यातील पक्षातील नेत्यांना जामनेरच्या कार्यक्रमाचे निमंत्रण दिले असल्याचे देखील महाजन म्हणाले.
राज्यातील महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना
राज्यात महिलांवर अत्याचार वाढले असून त्यांच्यामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळेच आज राज्यभर भाजपा आंदोलन करत असल्याची माहिती माजी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिली. गेल्या वर्षभरापासून या ठिकाणी शिवसेना,राष्ट्रवादी,काँग्रेस सरकार यांची सरकार आहे. सरकार आल्यापासून सर्वसामान्य शेतकरी, व्यापारी, महिला सगळेच संकटात आहेत. राज्यात महिलांवर बलात्कार सारखी घटना वाढल्या आहेत. म्हणूनच राज्यभर आंदोलन करत असल्याचे श्री. महाजन यांनी सांगितले.
















