सिंधुदुर्ग (वृत्तसंस्था) केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेना यांच्यातील शाब्दिक युद्ध सध्या राज्यात सुरु आहे. या सर्वात आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल उडी घेत राणेंवर खोचक टीका केली होती. पवारांच्या या टीकेला आता नारायण राणे यांनी त्यांच्या शब्दात प्रत्युत्तर दिलंय. अजित पवार अजून अज्ञात आहेत. त्यांनी आपलं खातं सांभाळावं, तसंच आपण अजून राष्ट्रवादीकडे वळलेलो नाही, अशा सूचक शब्दात इशाराही राणेंनी दिलाय.
आज कोकणातील जन आशीर्वाद यात्रेचा शेवटचा दिवस आहे. या पार्श्वभूमीवर नारायण राणे हे सिंधुदुर्गात माध्यमांशी बोलत होते. सिंधुदुर्गात पत्रकार परिषदेच्या वेळी नारायण राणे यांना अजित पवारांच्या टीकेसंदर्भात विचारले असता, ‘अजित पवार अजून अज्ञात आहे. त्यांनी आपल्या खात्याचं बघावं. मी अजून राष्ट्रवादीकडे वळलेलो नाही. आपल्यावर असलेल्या आरोप आणि केसेस कशा लढायच्या कोणी अजित पवारांकडून शिकलं पाहिजे’ अशा शब्दात नारायण राणे यांनी टीका केली आहे. तर यावेळी बोलताना शिवसेना घडविण्यात आपलाही हात असल्याचं नारायण राणे यांनी म्हटलं आहे.
अजित पवारांनी काय म्हटलं होतं
“सूक्ष्म आणि लहानमध्ये काय निधी मिळणार आहे?. निधी द्यायचं बोललं तर गडकरी साहेबाचं मंत्रालय देऊ शकतं. गडकरी साहेबांनी यापूर्वी निधी दिला आहे. कामं पण चालली आहेत. या खात्याचं पूर्वी नाव अवजड खातं होतं. काही लोकं त्याला गंमतीने अवघड खातंही म्हणायचे. आता त्याच्या नावात काही बदल झाले आहेत,” असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात आढावा बैठकीनंतर बोलताना म्हटलं होतं. “आता कोरोनाचं संकट आल्याने सुक्ष्म आणि लघू खूप सारे उद्योग अडचणीत आले आहेत. देशातील छोट्या उद्योगांसाठी एखादा निर्णय घेत येत असावा, असं वाटतं”, असं टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हाणला होता.