नवी दिल्ली (वृत्तसंस्था) दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावर टोकयो ऑलिम्पिकमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी सुवर्ण पदक विजेत्या नीरज चोप्राने आपल्या भावना व्यक्त केल्या. “ज्या दिवसांपासून पदक माझ्या खिशात आलं आहे. त्या दिवसापासून मी काही खाऊ शकलो नाही की, झोपू शकलो नाही, अशा भावना नीरज चोप्रा याने व्यक्त केल्या.
टोकयो ऑलिम्पिकमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावरच त्यांचं भव्य स्वागत करण्यात आलं. त्यानंतर ऑलिम्पिक विजेते थेट दिल्लीतील अशोका हॉटेलमध्ये पोहोचले. तिथे त्यांचा क्रीडामंत्री अनुराग ठाकुर, क्रीडा राज्यमंत्री निसिथ प्रामाणिक आणि कायदेमंत्री आणि माजी क्रीडामंत्री किरेन रिजीजू यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. भारताने टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत एकूण ७ पदक पटकावली आहे. त्यात एक सुवर्ण पदकाचा समावेश आहे. सुवर्ण पदक विजेत्या नीरज चोप्राने यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या. गोल्डन बॉय नीरज चोप्राने मंचावर आल्यानंतर सर्वांना सुवर्ण पदक दाखवलं. “ज्या दिवसांपासून पदक माझ्या खिशात आलं आहे. त्या दिवसापासून मी काही खाऊ शकलो नाही की, झोपू शकलो नाही. तुम्ही दिलेल्या आशीर्वादाबद्दल धन्यवाद”, असं नीरज चोप्रा याने सांगितलं.
‘मी कांस्य पदकाची लढत गुडघ्याच्या कॅपशिवाय खेळलो. माझ्या गुडघ्याला दुखापत झाली असती तर मला विश्रांती घ्यावी लागली असती. मात्र ही लढत माझं आयुष्य बदलणारी होती. मी माझं सर्वोत्तम दिलं.” असं कुस्तीपटू बजरंग पुनिया याने सांगितलं.