मुंबई (वृत्तसंस्था) राज्यसभेच्या महाराष्ट्रातील (Rajyasabha Election 2022) सहा जागा रिक्त झाल्या आहेत. मात्र, संभाजीराजेंकडून शिवसेनेच्या ऑफरवर प्रतिक्रिया न आल्याने अखेर शिवसेनेने संजय पवार यांना सहाव्या जागेवरुन उमेदवारी देण्याचं ठरवलं. त्यामुळे संभाजीराजेंचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले. यानंतर आता संभाजीराजेंनी सूचक ट्वीट केलं आहे. “मी बांधील असेन तो फक्त जनतेशी” असं संभाजीराजे आपल्या ट्विटमधून म्हणाले आहेत.
संभाजीराजे छत्रपती यांनी ट्विटरवर एक फोटो पोस्ट केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समोर नतमस्तक होणारा फोटो संभाजीराजेंनी शेअर केला आहे. हा फोटो पोस्ट करताना संभाजीराजेंनी लिहिलं, “महाराज… तुमच्या नजरेतलं #स्वराज्य मला घडवायचंय… मी कटीबद्ध असेन तो तुमच्या विचारांशी… मी बांधील असेन तो फक्त जनतेशी..”
संभाजीराजे यांनी केलेल्या या ट्विटमुळे आता संभाजीराजे काय निर्णय घेतात याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. शिवसेनेने संजय पवार यांना सहाव्या जागेसाठी उमेदवारी दिल्यानंतर आता संभाजीराजे अपक्ष निवडणूक लढणार की नाही? याबाबत अद्याप स्पष्टता नाहीये. तर जोपर्यंत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सहाव्या जागेसाठी अधिकृत उमेदवाराची घोषणा करत नाहीत तोपर्यंत संभाजीराजे प्रतिक्रिया देणार नाहीत.