नाशिक (वृत्तसंस्था) त्रिपुरातील घटनेनंतर अमरावतीसह राज्यात होत असलेल्या घटनांमागे भाजपचा हात असल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला होता. यावर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत यांचे वक्तव्य ऐकून किव येते. बाळासाहेब ठाकरे आज असते, तर त्यांनी एक थोबाडीत दिली असती, असा घणाघात पाटलांनी केला आहे.
संजय राऊत यांनी केलेल्या विधानाची आपल्याला कीव येत असल्याचं चंद्रकांत पाटील नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलताना म्हणाले. “त्रिपुरातील घटनेचे पडसाद म्हणून मालेगावात दंगली होण्यापेक्षा दुर्दैवी संजय राऊतांनी केलेलं वक्तव्य आहे. मला खूप कीव येते, वाईट वाटतं. राजकारणासाठी आपण किती लाचार झालो आहोत. आज स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे जिवंत पाहिजे होते. त्यांनी एक थोबाडीत दिली असती”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
ज्या समाजकंटकांनी हा प्रकार घडवून आणला, त्यांच्यावर टीका करावी, असा सल्ला चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊतांना दिला आहे. “तुम्ही राज्य करा, कोण नाही म्हणतंय. मुसलमानांची मतं मिळवा. मी म्हणतोच, की ९५ टक्के मुसलमान देशप्रेमी आहेत. या भूमीला तो आपली भूमी मानतो. पण त्रिपुरात मशीद तोडली तर तिथे काहीतरी करा. पण ५ टक्के मुस्लिमांपैकी काहींनी त्यावरून मालेगाव, अमरावतीत गोंधळ घातला. तुम्ही त्यांच्यावर टीका करा ना. यामुळे ९५ टक्के मुस्लीम तुम्हाला मतं देणार नाही असं नाहीये. ५ टक्के मुसलमान धार्मिक चिथावणीला बळी पडून हे करतो. त्याच्यावर तुम्ही टीकाही करणार नाही? प्रत्येक विषयात झोपताना उठताना तुम्हाला भाजपाच दिसतोय”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.