धुळे (प्रतिनिधी) महाराष्ट्रातील भाजपाची अवस्था धरलं तर चावतं आणि सोडलं तर पळत अशी विचित्र झाली आहे. दुसऱ्यांचे पक्ष फोडून मिळवलेलं यश ‘शेजाऱ्याच्या प्रयत्नाने पोर झाल्यासारख’ क्षणभंगूर एव्हाना भाजपा नेतृत्वाला कळालं असावं, असं सडेतोड उत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष व धुळे, नंदूरबार जिल्ह्याचे प्रभारी अनिल अण्णा गोटे यांनी एका प्रसिद्ध पत्रकातून दिले आहे.
भाजपाचा १०६ आकडा आज भलेही असो! पण भाजपाचे मुळ केवळ ३२ आमदार आहेत. १०६ आकड्याची आलेली सूज येत्या निवडणुकी पुर्वीच उतरायला सुरूवात होईल. दलित मुस्लिमांबद्दलचा टोकाचा द्वेष, पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचा गॅस, खाद्यतेल इत्यादी जीवनावश्यक वस्तुंचे आकाशाला भिडलेली महागाई यावर दिल्लीपासूनचा एकही नेता थोबाड उघडायला तयार नाही. मोदींच्या मंत्रीमंडळात तर विदूषकच भरले आहेत. एक मंत्री सांगतो कोरोना लस फुकट दिल्याने पेट्रोल डिझेलचे दर वाढत आहेत’ दुसरा मंत्री सांगतो धान्य फूकट दिल्यामूळे सरकारी तिजोरीवर वाढलेला बोजा’ हे कारण आहे. पेट्रोल-डिझेल-गॅस दरवाढीतून केंद्र सरकारच्या तिजोरीत तब्बल २६ लाख कोटी रूपये आले आहेत. तर, कोरोना लसीचा खर्च अंदाजे ४५ हजार कोटी आहे. कोरोनाची लस फुकट दिली यात आश्चर्य काही नाही. भारतात मागील ७० वर्षात पोलिओ देवी कॉलरा इत्यादी आजारावरील लसीकरण फुकटच केले जाते. भाजप सरकारने कोरोना लसीकरण फुकट केले काय देशावर उपकार केले नाही. सार्वजनिकपणे आपल्या अकलेचे तारे तोडण्याचा यांनी जागतिक विक्रमच करून टाकला आहे. पोटनिवडणुकीत लोकसभेच्या तीनही जागांवर दोन काँग्रेस व एक शिवसेना तर विधानसभेच्या २९ जागांपैकी भाजपच्या वाट्याला केवळ ३ जागा आल्या आहेत. सेनेचे एकनिष्ठ आमदार सुभाष साबणे यांना सेनेतून फोडून तिकीट दिले. देवेंद्रापासून ते भगेंद्रापर्यंत सर्वांनी मजबूत घासून घेतली. पण तब्बल ४२ हजार मतांनी महाविकास आघाडीचा उमेदवार विजयी झाला. एका निवडणूकीवरूनच लक्षात येत की ग्रामीण भागातील जनतेच्या मनात भाजपाविषयी किती संताप आणि द्वेष ओतप्रेत भरला आहे.
जागतिक पातळीवर यापेक्षा वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे. पंतप्रधानांच्या अमेरीकेच्या दौऱ्यात प्रत्यक्ष मोदींच्याच गाडीवर दगडफेक झाली. भारतासारख्या विशाल देशाच्या पंतप्रधानाच्या स्वागताला इटलीसारख्या छोट्या देशाचे पंतप्रधान आले नाहीत. तब्बल ९ हजार कोटी रूपयांचे राजेशाही विमान घेवून पंतप्रधान इटली दौऱ्यावर गेले. पंतप्रधान मोदींसाठी इटली सरकारने सरकारी गाडीची नव्हे तर, टॅक्सीची व्यवस्था केली होती. देशातील बेरोजगारी दिवसागणीक वाढत आहे. शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. एक वर्षापासून शेतकरी रस्त्यावर बसले आहेत. सत्यपाल मलीक राज्यपाल अत्यंत कठोर शब्दात पंतप्रधानांची व शहाची निर्भत्सना करीत आहेत. जनतेच्या दैनंदिन जिवनाशी निगडीत असलेल्या प्रश्नाबद्दल एकही भाजपायी थोबाड उघडत नाही. मात्र आपल्या राजकीय विरोधकांचा छळ करण्याकरीता इन्कमटॅक्स, ईडी, सी.बी.आय, एन. आय. ए. अशा केंद्र स्तरावरील संस्थाचा वापर करून विरोधकांबरोबरच त्यांच्या कुटूंबीयांनाही लक्ष केले जात आहे. भारतीय जनता पक्षातील नेत्यांना सत्तेचा आलेला माज आणि मस्ती या देशाची जनता उतरवून टाकल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्रातील मस्तवाल भाजपाला माझा एकच इशारा आहे की, “तो दिवस दूर नाही. ज्या दिवशी महाराष्ट्राची जनता आपल्या पाप कर्माचा हिशोबाची गणती रस्त्यावर केल्याशिवाय राहणार नाही”. असे सडेतोड पत्रक राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष व धुळे, नंदूरबार जिल्ह्याचे प्रभारी अनिल अण्णा गोटे यांनी प्रसिध्दीस दिले आहे.