अमळनेर (प्रतिनिधी) एकीकडे कोरोना रुग्ण वाढत असताना ऑक्सिजन तसंच रेमडेसिविरचा तुटवडा निर्माण झाला आहे. आमच्याकडे औषधीचा पुरवठा करण्यासाठीचे सर्व परवाने आहेत. आता शासनाने परवानगी दिल्यास आपण ना-नफा ना-तोटा तत्वावर १० लाख रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा करणार असल्याचे प्रतिपादन अमळनेरचे माजी आमदार शिरीष चौधरी यांनी पत्रकार परिषदेत केले.
सध्या रेमडेसिवीर इंजेक्शनच्या पुरवठ्यावरून राष्ट्रवादीचे प्रवक्ते तथा राज्याचे अल्पसंख्यांक खात्याचे मंत्री नवाब मलिक यांनी अमळनेरचे माजी आमदार शिरीष चौधरी व त्यांचे बंधू डॉ. रवींद्र चौधरी यांनी रेमडेसिवीर इंजेक्शनचा अवैध साठा करत याचे वाटप चालविले असल्याचा गंभीर आरोप केला. शिरीष चौधरी यांनी तातडीने या आरोपाचे खंडन केले. यानंतर त्यांनी अमळनेर येथे आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली.
यावेळी शिरीष चौधरी यांनी औषधीच्या वितरणासाठी त्यांच्याकडे असलेल्या परवानगीची कागपत्रे सादर केली. ते म्हणाले की, आमच्याकडे रेमडेसिविर इंजेक्शनसाठी लागणारे सर्व परवाने आहेत. शासनाने परवानगी दिल्यास आपण दहा लाख इंजेक्शन उपलब्ध करून देऊ शकतो. गरजू रुग्णांना आपण ना नफा ना तोटा या तत्वावर रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध करून दिले. काही कंपन्यांकडे उपलब्ध असलेला साठा जनतेला उपलब्ध करून घ्यावा अशीही मागणी आपण केली असल्याची माहिती शिरीष चौधरी यांनी दिली आहे.