मुंबई (वृत्तसंस्था) आज आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते पंढरपुरात विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा करण्यात आली. या महापूजेसाठी उद्धव ठाकरे भर पावसात स्वत: ड्रायव्हिंग करत पंढरपुरात दाखल झाले होते. यावरून आता विरोधी पक्ष नेत्यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. भाजपा नेते अतुल भातखळकर म्हणाले, ‘स्वतः ड्रायव्हिंग करत शनिवारी चेंबूरपर्यत गेले असते तर लोटांगण घातलं असतं’ असं म्हणत टीका केली आहे.
भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी मुंबईत झालेल्या दुर्घटनेच्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला असून “स्वतः ड्रायव्हिंग करत शनिवारी चेंबूरपर्यत गेले असते तर लोटांगण घातलं असतं,” असं ट्वीट केलं आहे. याआधीही अतुल भातखळकरांनी उद्धव ठाकरेंनी घटनास्थळी जाऊन भेट न देण्यावरुन टीका केली होती. “मुंबईत २५ लोक पावसामुळे मेले तरी मुख्यमंत्री महोदय घर सोडायला तयार नाहीत, हात टेकले यांच्यासमोर..,” असं ते म्हणाले होते. दरम्यान, अतुल भातखळकर यांनी शासकीय महापुजेवरुनही उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. “जो टिपू से करते है प्यार. वो क्यू करते है विठू माऊली को नमस्कार?,” असं खोचक ट्विट त्यांनी केलं आहे.
दरम्यान, चेंबूरच्या वाशीनाका परिसरातील डोंगरावर वसलेल्या न्यू भारत नगर या झोपडपट्टीवर भाभा अणुसंशोधन केंद्राची (बीएआरसी) संरक्षक भिंत कोसळली. या दुर्घटनेत १९ नागरिकांचा मृत्यू झाला, तर सात जण जखमी झाले. तसेच विक्रोळीतील सूर्य नगर येथील पंचशील चाळीतील सहा घरांवर रविवारी पहाटे दोनच्या सुमारास दरड कोसळून १० नागरिकांनी जीव गमावला आणि पाच जण जखमी झाले. भांडुपच्या महाराष्ट्र नगर परिसरातील अमर कौर विद्यालायाशेजारील घराची भिंत कोसळून सोहम थोरात या १६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला, तर अंधेरी आणि पोयसर येथे विजेच्या धक्क्याने दोघांचा मृत्यू झाला.