नाशिक (वृत्तसंस्था) धर्मवीर आनंद दिघे यांच्या बाबतीत जे घडलं, त्याचा मी साक्षीदार आहे. त्यांच्यासोबत घडलेल्या घटना मी माझ्या डोळ्यांनी पाहिल्या आहेत. त्यांच्यावर ओढावलेले प्रसंग देखील मी पाहिले आहेत. याविषयी मी आज काही बोलणार नाही. पण जेव्हा समोरुन तोंड उघडलं जाईल, तसं मला देखील त्या गोष्टींवर बोलावं लागेल, असा सूचक इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिला.
आमदार आदित्य ठाकरे यांनी निष्ठा यात्रेच्या माध्यमातून राज्यातील अनेक जिल्ह्यांचा दौरा सुरू आहे. त्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील राज्याचा दौरा सुरू केला आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाशिकच्या मालेगाव दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावर असताना मालेगाव येथील जाहीर सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधक आणि शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘काही गोष्टी त्यांच्या व माझ्यातील आहेत. त्या मी आता बोलणार नाही. जशा गोष्टी समोर येतील. तसं मलाही तोंड उघडावे लागेल. धर्मवीर आनंद दिघेंच्या आयुष्यात जे जे काय घडलंय. त्याचा मीही साक्षीदार आहे. तुम्ही फक्त सिनेमात पाहिलं आहे. पण नेमकं काय घडलं होतं, त्यावरही मी योग्यवेळी बोलेन, असं शिंदे म्हणाले.
उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, आम्ही आमच्या कुटुंबाला वेळ दिला नाही. रात्र-दिवस शिवसेनेसाठी काम केले. या मेहनतीमधून शिवसेना मोठी झाली. राष्ट्रवादी काँग्रेस सोबत सत्ता स्थापन करून मुख्यमंत्री झाले. मग हा विश्वासघात, गद्दारी कोणी आम्ही केली तुम्ही केली असा सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. धर्मवीर सिनेमा काही लोकांना रुचला नाही. पचला नाही, मी आज जाहीरपणे बोलणार नाही. आज ज्या मुलाखतीचा सपाटा चालू आहे त्यावरही मी बोलणार नाही. ज्या दिवशी माझी मुलाखत होईल त्यावेळी भूकंप होईल असा इशारा एकनाथ शिंदे यांनी दिला. ‘हिंदुत्वाची भूमिका घेऊन आम्ही भाजपसोबत गेलो. अडीच वर्षात हजारो लोकांवर गुन्हे दाखल झाले. शिवसेनेच्या सरकारमध्ये शिवसैनिकांवर गुन्हे दाखल झाले हे मान्य आहे का ?’, असा सवाल मुख्यमंत्री शिंदे यांनी उपस्थितांना केला.