मुंबई (वृत्तसंस्था) शिवसेना भवनासमोर आज शिवसेना आणि भाजप कार्यकर्ते आमने-सामने आल्यानंतर जोरदार राडा झाला. उगाचच कळ काढली तर त्याला चोख उत्तर दिले जाईल. आमच्या अंगावर याल तर शिंगावर घेऊच, असा इशारा महापौर किशोरी पेडणेकर यांनी भाजपला दिला आहे.
शिवसेना-भाजपमधील धुमश्चक्रीनंतर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी हा सज्जड इशारा दिला आहे. शिवसेना भवन येथील श्रद्धास्थानासमोर भाजपच्या कोणत्यातरी एका पोरानं उगाच ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला. तो शिवसैनिकांनी हाणून पाडलाय, असं सांगतानाच शिवसेना भवनावर मोर्चा काढणं कितपत योग्य आहे याचं उत्तर द्या. तुम्हीही काहीही कराल आणि शिवसैनिक गप्प बसणार काय?, असा सवाल पेडणेकर यांनी केला आहे.
शिवसेना नेते सचिन अहिर यांनीही या राड्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आजचे भाजपचे आंदोलन निषेधार्ह आहे. शिवसेनेची राम जन्मभूमीबद्दल भूमिका काय आहे हे कोणीही आम्हाला शिकवण्याची गरज नाही. शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री बनण्याआधी आणि बनल्यानंतरही राम जन्मभूमीला भेट देऊन आले आहेत, असं सांगतानाच तुम्ही अॅक्शन कराल तर त्याला रिअॅक्शन मिळणारच. भाजपने प्रतिकात्मक आंदोलन केल असतं तर चाललं असतं. राणीच्या बागेत फिरायला गेल्यासारखं आंदोलन त्याठिकाणी केलं. ते ठिकाण शिवसेनाभवन आहे हे विसरून चालणार नाही, असा इशारा सचिन अहिर यांनी दिला आहे.