हैदराबाद (वृत्तसंस्था) ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना खुले आव्हान दिले आहे. जर मतदारांच्या यादीत ३० हजार रोहिंग्यांच नावे असतील तर मग अमित शहा करत काय आहेत. भारतीय जनता पक्ष खरेच प्रामाणिक असेल तर त्याने मंगळवार संध्याकाळपर्यंत अशी १००० नावे दाखवावी, असे आवाहन ओवेसी यांनी केले आहे.
मतदार यादीत ३० ते ४० हजार रोहिंग्यांची नावे कशी काय नोंदवली गेली हे पाहणे अमित शहा यांचे काम नाही का, असे सवाल ओवेसी यांनी उपस्थित केले. ओवेसी सोमवारी हैदराबादमधील एका जनसभेला संबोधित करत होते. त्यांचा उद्देश द्वेष परसरवणे हा आहे. ही लढाई हैदराबाद आणि भाग्यनगरदरम्यान आहे. कोण जिंकेल हे ठरवणे आपली जबाबदारी आहे, असे ओवेसी म्हणाले. भाजपचे उमेदवार रेनू सोनी यांच्यावर आपण घांसी बजार येथे गुन्हा दाखल करू असे ओवेसी यांनी म्हटले. रेनू कुमारी यांनी चुकीच्या पद्धतीने मागासवर्गीय असल्याचे प्रमाणपत्र मिळवले असल्याचे ओवेसी यांचा आरोप आहे. आपण रेनू कुमारी यांना वचन देतो की त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करणारच असे रेनू यांना उद्देशून ओवेसी म्हणाले. त्या विरोधात तुम्ही कोर्टाचा दरवाजा देखील ठोठावू शकता. तुम्ही खोटे बोलून आणि फसवून प्रमाणपत्र प्राप्त केले आहे, असे ओवेसी यांनी म्हटले आहे.
तेलंगणामध्ये भारतीय जनता पक्षाचे सरकार आल्यास हैदराबादचे नाव बदलून ते भाग्यनगर असे करणार असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी वर्ष २०१८ मध्ये म्हटले होते. जर तुम्हाला हैदराबादचे नामकरण भाग्यनगर असे करायचे असेल तर भारतीय जनता पक्षाला संधी द्या, असे त्यावेळी योगी आदित्यनाथ म्हणाले होते.