नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येदरम्यान इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) कोरोना चाचणीबाबत नवीन सुधारित गाईडलाईन्स जारी केली आहे. ज्यामध्ये कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना कोरोना चाचणी करण्याची आवश्यकता नाही, असे सांगण्यात आले आहे.
आयसीएमआरच्या या निर्णयानुसार आता कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांची कोरोना चाचणी करण्याची गरज नाही. कोरोना रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तीला जास्ती धोका नसेल अशाच व्यक्तींसाठी हा निर्णय आहे. मात्र, ज्यांचे वय जास्ती आहे किंवा त्यांना अन्य आजार आहे, त्यांना कोरोना चाचणी करावी लागणार आहे.
होम आयसोलेशननंतर डिस्चार्ज करण्यात आलेल्या रुग्णांना किंवा कोविड सेंटरमधून डिस्चार्ज झालेल्या रुग्णांनाही कोरोना चाचणी करण्याची गरज नसल्याचं आयसीएमआरने म्हटलंय. दरम्यान, खोकला, ताप, घशात त्रास, चव किंवा वास येत नसेल आणि कोरोनाची अन्य लक्षणं असलेल्या व्यक्तींना कोरोना चाचणी करण्याची गरज आहे. यातही जी व्यक्ती ६० वर्षापुढील आहे किंवा ज्यांना मधुमेह, उच्च रक्तदाब, फुफ्फुसात त्रास किंवा त्यासंबंधी आजार असेल तर त्यांना कोरोना चाचणी करण्याची गरज आहे. रुग्णालयांसाठीही आयसीएमआरकडून काही निर्देश देण्यात आले आहेत.