नवी दिल्ली (वृत्तसंस्था) बेल्जिअममध्ये ९० वर्षीय महिलेला एकाच वेळी कोरोनाच्या दोन वेगळ्या विषाणूंची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या या महिलेला कोरोनाच्या अल्फा आणि बेटा या दोन्ही विषाणूंची लागण झाली होती. हे प्रकरण समोर आल्यानंतर संशोधकांची चिंताही वाढली आहे.
९० वर्षाच्या या महिलेमध्ये एकाचवेळी अल्फा आणि बिटा हे कोरोनाचे दोन व्हेरिएंट आढळले. या महिलेनं लस घेतलेली नव्हती आणि घरीच तिच्यावर उपचार सुरू होते. मात्र, प्रकृती जास्त बिघडल्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रुग्णालयात महिलेची कोरोना चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आली. सुरुवातीला महिलेची ऑक्सिजन पातळी चांगली होती. मात्र, नंतर तिची तब्येत बिघडत गेली आणि पाचव्याच दिवशी महिलेचा मृत्यू झाला.
रुग्णालयातील स्टाफनं महिलेला कोरोनाच्या कोणत्या व्हेरिएंटचा संसर्ग झाला होता, हे तपासण्याचा प्रयत्न केला असता यात दोन व्हेरिएंट आढळून आले. तिला अल्फा आणि बिटा व्हेरिएंटची लागण झाली होती. अल्फा सर्वात आधी ब्रिटन आणि बिटा दक्षिण आफ्रीकेत आढळला होता. संशोधक अशा प्रकारची प्रकरणं गंभीरतेनं घेण्याचा सल्ला देत आहेत.