बोदवड (प्रतिनिधी) येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, विद्यार्थी विकास कक्ष आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, विद्यार्थी विकास विभाग, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने सहा दिवसीय आत्मनिर्भर युवती अभियान प्राचार्य अरविंद चौधरी यांच्या मार्गदर्शनात संपन्न झाले.
अभियानाची सुरुवात दिनांक रोजी बोदवड पोलीस स्टेशनला क्षेत्रभेट देऊन करण्यात आली. पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांचे प्रतिनिधी म्हणून पोलीस कॉन्स्टेबल दीपक पाटील यांनी सायबर क्राईम आणि सोशल मीडियाचा वापर या विषयावर अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती दिली. सायबर क्राईम अंतर्गत येणाऱ्या शिक्षा व त्यांचे स्वरूप सविस्तर समजावून सांगितले. सोशल मीडियाचा वापर करत असताना कशी काळजी घ्यावी वगैरे सांगितले. सोबतच पोलीस स्टेशनचे कार्य कसे चालते हे जेल रूम, ऑफिस, वॉकी- टॉकी चे महत्व, मुद्देमाल अथवा शस्त्र बंद खोलीत ठेवले जातात ते सर्व काही त्यांनी विद्यार्थिनींना प्रत्यक्ष दाखविले.
अभियानाच्या दुसऱ्या दिवशी रोजी बोदवड पंचायत समितीला क्षेत्रभेट देण्यात आली. प्रसंगी बचत गट अधिकारी संदीप मेश्राम यांनी स्वयंरोजगाराच्या विविध शासकीय योजना या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. अटल पेन्शन योजना, दीनदयाळ ग्रामीण कौशल्य विकास योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, बचत गट योजना, कुक्कुटपालन, शेळी पालन, शिलाई मशीन, ब्युटी पार्लर एवढेच नव्हे तर महाविद्यालयीन विद्यार्थी व विद्यार्थ्यांसाठी असलेले ट्रेनिंग प्रोग्रॅम विषयी अतिशय चांगल्या पद्धतीने माहिती दिली.
अभियानाच्या तिसऱ्या दिवशी ग्रामीण रुग्णालय बोदवड येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. शिल्पा शर्मा यांनी महिला आरोग्य: समस्या व उपाय या विषयावर आरोग्य विषयक व्याख्यान देऊन मुलींच्या समस्यांचे आजाराचे निराकरण केले. आरोग्याची कशी काळजी घ्यावी आहार कसा आणि केव्हा घ्यावा दररोज व्यायाम योगा करावा इतर बऱ्याच गोष्टी त्यांनी समजावून सांगितल्या. एवढेच नव्हे तर अभियानात सहभागी असलेल्या सर्व विद्यार्थिनींचे सीबीसी, एचबी, थायरॉईड व इतर रक्त संबंधित चाचण्या देखील करून दिल्यात.
अभियानाच्या चौथ्या दिवशी रोजी बँक ऑफ महाराष्ट्र शाखा बोदवड येथील मॅनेजर मा. स्वदेश पाटील यांनी शासनाच्या कृषी विषयक योजना आणि बँकेची भूमिका या विषयावर मार्गदर्शन करत कृषी विषयक विविध कर्जाची उपलब्धता कागदपत्रे व प्रक्रिया तसेच शैक्षणिक कर्ज आणि बँकिंग क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी उपयुक्त असलेल्या परीक्षण बाबतची माहिती सविस्तर विद्यार्थिनींना समजून सांगितले.
अभियानाच्या पाचव्या दिवशी बोदवड महाविद्यालयातील वनस्पती शास्त्र विभाग प्रमुख डॉ.गीता पाटील यांनी व्यक्तिमत्व विकास या विषयावर विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. व्यक्तिमत्व विकास म्हणजे काय? हे सांगताना त्यांनी आधी स्वतः मधल्या छोट्या छोट्या क्षमता ओळखून त्यांना विकसित करण्याचा प्रयत्न कसा करावा हे सविस्तर सांगितले. एखाद सुंदर व्यक्तिमत्व फुलत असताना, बहरत असताना त्यामध्ये एक मोठी प्रक्रिया घडत असते. व्यक्तिमत्त्वाची ही जडणघडण सातत्याने प्रयत्न, परिश्रम आणि इच्छाशक्तीच्या जोरावर करायची असते असेही त्यांनी सांगितले. सकारात्मक दृष्टिकोन, नवनवीन लोकांशी संवाद साधने, स्वतःचा स्वीकार करून आत्मविश्वास वाढविणे तसेच इतरांच्या मतांचा आदर करणे, इतरांना लक्षपूर्वक ऐकणे, नैतिक मूल्यांशी तडजोड न करणे, स्वाभिमानाने आणि आत्मविश्वासाने जगणे ह्याबाबत देखील मार्गदर्शन केले.
अभियानाचा सहावा दिवस रोजी समारोपाने संपन्न झाला. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावचे परीक्षा व मूल्यमापन मंडळ सदस्य तथा विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. अजय पाटील समारोप समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते.
समारोप समारंभाच्या प्रमुख अतिथी ती. र. बरडीया प्राथमिक शाळा बोदवड येथील मुख्याध्यापिका रंजना काठोके यांनी विद्यार्थिनींना संसार करत असताना आणि जीवन जगत असताना आत्मनिर्भरता किती आवश्यक आहे याचे महत्त्व विविध उदाहरणे समोर ठेवून पटवून दिले. विद्यार्थिनींना स्वावलंबी होण्यासाठी प्रेरणा दिल्यात. डॉ. अजय पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थिनींनी आत्मनिर्भर होणे हे काळाची गरज कशी आहे सोदाहरण स्पष्ट करून सांगितले. हे स्पष्ट करत असताना विद्यार्थिनींना त्यांनी प्रश्न केले असता अनेक कारणे विद्यार्थिनींनी पुढे केले त्यावर त्यांनी “जीन्हे मंजिल पे जाना होता है, वो कभी शिकवे नही करते और जो शिकवे मे उलझे होते है, वो मंजिल कभी पा नही सकते” असे प्रतिपादन केले.
समारोप प्रसंगी वैष्णवी दिनकर माळी, निकिता सुनील मोठेकर, दिपाली कासार, साक्षी विजयकुमार सूर्यवंशी यांनी मनोगते व्यक्त केली. वरील पाच दिवसातील सर्व कार्यक्रमाची प्रस्तावना डॉ. अजय पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. रूपाली तायडे यांनी केले. समारोप समारंभाची प्रस्तावना, अहवाल वाचन, सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन महिला विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. रूपाली तायडे यांनी केले. सदर अभियानात ५० विद्यार्थिनींनी उस्फूर्तपणे सहभागी झाल्या. अभियान यशस्वीतेसाठी शिपाई राजू मापारी, काशिनाथ भोई, समीर पाटील, वृषभ बावस्कर, राजरत्न तायडे, आणि ईश्वर पाटील ,यांनी परिश्रम घेतले