जळगाव (प्रतिनिधी) विनाअनुदानित तत्वावरून अनुदानित तत्वावर शिक्षक सेवक म्हणून नियुक्तीस मान्यता देण्यासाठी 2 लाख 30 हजारांची लाच मागणार्या जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागातील योगेश अशोक खोडपे (वय-40) रा. ममता राणे नगर, वाघ नगर या वरीष्ठ लिपीकास गुरुवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली होती. आज खोडपेला न्यायलयात हजर केले असता त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
काय होती नेमकी घटना
जळगाव येथील आर.आर.माध्यमिक विद्यालयात तक्रारदार यांचे भाऊ शिक्षणसेवक म्हणून सन २०१४ पासून कार्यरत आहेत. त्यास अनुदानित तत्वावर शिक्षणसेवक पदावर नियुक्तीच्या मान्यतेसाठी जिल्हा परिषदेत माध्यमिक शिक्षण विभागात कार्यरत वरिष्ठ लिपिक योगेश अशोक खोडपे, (रा.ममता राणे नगर,वाघनगर जळगाव,) याच्याकडून १२ फेब्रुवारी २०२१ रोजी २ लाख ३० हजार रूपयांची मागणी करण्यात आली. तक्रारदाराने यासंदर्भात लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार नाशिक परिक्षेत्राचे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांच्या मार्गदर्शनानुसार जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उपअधीक्षक शशिकांत पाटील यांच्या पथकाकडून लाचेची मागणी केल्याप्रकरणी खोडपे याच्यावर गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली होती.
इतर वरिष्ठ अधिकारी / कर्मचारींचा देखील संबध असल्याचा पोलिसांना दाट संशय
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज संशयित आरोपी योगेश अशोक खोडपे याने आधीही यापूर्वीही अशाच प्रकारे इतर शाळेतील रिक्त अनुदानित पदावर नियुक्ती होण्याबाबतचे प्रस्तावावर अनुकुल अहवाल तयार करुन देण्याच्या मोबदल्यात शिक्षक अथवा शिक्षण क्षेत्रातील कर्मचारी यांच्याकडून लाचेची रक्कम घेतली असल्याची शक्यता आहे. त्याबाबत पोलीस आता तपास करणार आहेत. एवढेच नव्हे तर सदर लाच मागणी प्रकरणात शिक्षण विभागातील इतर वरिष्ठ अधिकारी / कर्मचारी यांचा आर्थिक हित संबंध असल्याची दाट शक्यता आहे. त्याबाबत खोडपेची कसून चौकशी होण्याची शक्यता आहे.
खोडपेची बँक अंकाऊन्टसह आर्थिक गुंतवणूकीची पोलीस घेणार माहिती
संशयित आरोपी खोडपे याची मालमत्ता, बँक अंकाऊन्ट, पतपेढी ठेवी, शेअर्स व इतर आर्थिक गुंतवणुक तसेच स्थावर व जंगम मालमत्ता असण्याचा संशय आहे. त्याबाबत खोडपेची पोलीस कोठडीत कसून चौकशी होणार आहे. दरम्यान, खोडपेवरील कारवाईनंतर जिल्हा परिषदेत एकच खळबळ उडाली आहे. अगदी आजही माध्यमिक व शिक्षण विभागात शुकशुकाट दिसून आला.
यांनी केली होती कारवाई
पोलीस उपअधीक्षक शशिकांत एस. पाटील, पोलीस निरिक्षक संजोग बच्छाव, स.फौ.दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील, अशोक अहीरे, सुनिल पाटील, रविंद्र घुगे, शैला धनगर, मनोज जोशी, जनार्धन चौधरी, प्रविण पाटील, महेश सोमवंशी, नासिर देशमुख, ईश्वर धनगर, प्रदिप पोळ यांच्या पथकाने कारवाई करत संशयित योगेश अशोक खोडपे याला अटक केली होती.