मुंबई (वृत्तसंस्था) राज्यात नव्याने आढळणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक अधिकच वेगाने वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर पुन्हा लॉकडाऊनची तयारी करण्याच्या दृष्टीने नियोजन केलं जात असल्याच्या चर्चांनीही जोर धरला आहे. मात्र, आता काँग्रेसनंही लॉकडाऊनला थेट विरोध दर्शवला आहे. त्यामध्ये, लॉकडाऊन करणार असाल, तर अगोदर लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा करा, असा इशारावजा सल्लाच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सरकारला दिलाय.
गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्यानं होणारी वाढ, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी प्रशासनाला लॉकडाऊनच्या उपाययोजना करण्याचे दिलेले आदेश, भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचा लॉकडाऊनला असलेला विरोध पाहता सर्वत्र लॉकडाऊनचीच चर्चा आहे. त्या पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्री डॉ. राजेश टोपे यांनीही महत्त्वाची माहिती दिली. लॉकडाऊन कोणालाही आवडत नाही. पण तहान लागल्यावर विहीर खणायची नाही. त्यामुळेच लॉकडाऊनची पूर्वतयारी करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र, आता काँग्रेसनंही लॉकडाऊनला थेट विरोध दर्शवला आहे.
काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराच चव्हाण यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक पत्रच शेअर केलं आहे. त्यामध्ये, लॉकडाऊन करणार असाल, तर अगोदर लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा करा, असा इशारावजा सल्लाच चव्हाण यांनी सरकारला दिलाय. राज्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे, मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राच मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे, प्रशासन आणि राज्य सरकार यांच्यापुढे पेचप्रसंग उभा आहे. सध्या, उद्योजकांपासून ते सर्वसामान्य नागरिक लॉकडाऊन विरोध करत आपल मत मांडत आहे. त्यामुळे, राज्य सरकारने काही बाबी लक्षात घ्याव्यात, असे चव्हाण यांनी आपल्या पत्रातून सूचवलंय.