चोपडा (प्रतिनिधी) महाराष्ट्र शासनाच्या बांधकाम कामगारांसाठी गृहपयोगी वस्तू वाटप योजनेचा फॉर्म भरताना अनेक सामान्य महिलांना फसवणुकीचा अनुभव आला आहे. रोजंदारीवर काम करणाऱ्या या महिलांनी फॉर्म भरण्यासाठी १५०० ते २००० रुपये दिले, परंतु त्यांना आजतागायत केवळ तारीख पुढे ढकलल्याचे कळवले जाते. या महिलांना आशा दाखवून फसवले जात असल्याचे चित्र आहे.
नवरात्रीच्या उपवासाच्या काळात उन्हातान्हात दिवसभर रांगेत उभे राहून महिलांना आपले हक्क मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. एकीकडे मतांसाठी ‘लाडकी बहीण’ म्हणतात, आणि दुसरीकडे योजनेच्या नावाखाली महिलांना फसवतात, अशा भावना महिलांनी व्यक्त केल्या. चोपडा येथे गेल्या आठ दिवसांपासून महिलांना आपले रोजंदारीचे काम बुडवून तासनतास वाटप केंद्रात उभे राहावे लागत आहे. काहींनी आपल्या लहान मुलांसह योजनेचे वाटप होईल या आशेने वाट पाहिली, पण पदरी निराशाच पडली.
महिलांनी शासनाविरोधात नाराजी व्यक्त करत योजनेच्या नावाखाली फसवणूक चालू असल्याचा आरोप केला आहे. “लाडकी बहीण योजना” म्हणून प्रचार केला जात असताना, वस्तूंचे दर वाढवून महिलांची फसवणूक केली जात असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
शासनाच्या योजनेतील या त्रुटी त्वरित दूर करून महिलांच्या समस्यांवर उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी या संतप्त महिलांनी केली आहे.