जळगाव : प्रतिनिधी
शहरात एका खासगी क्लास संचालकांनी नियुक्त केलेल्या महिला शिक्षिकेने नऊ वर्षाच्या बालक विद्यार्थ्यास कपडे काढून अमानुषपणे मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे.
शनीपेठ परिसरातील गुरुनानक नगर भागात राहणारे एक नऊ वर्षाचा मुलगा बळीराम पेठेतील कोठारी क्लासेस येथे शिकण्यासाठी जातो. या क्लासमधे पहिली ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिकवले जाते. या क्लासमधील पल्लवी नामक नियुक्त शिक्षीकेने नऊ वर्षाच्या बालकाचे कपडे काढून त्याला चापटक़ाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे पालकांच्या निदर्शनास आले.
आपल्याला नेहमी मारहाण होत असल्याची तक्रार मुलाने पालकांकडे केली होती. या तक्रारीत कितपत तथ्य आहे हे बघण्यासाठी त्यांनी अचानक या क्लासमधे प्रवेश केला असता खरा प्रकार उघड झाला. पालक समोर येताच या शिक्षिकेने विद्यार्थी बालकास त्याचे कपडे परत देत सावरासावर करण्यास सुरुवात केली होती. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा, पालक जळगाव शहर पोलिस स्टेशनला तक्रार दाखल करण्यास गेले असल्याचे कळते.