जळगाव (प्रतिनिधी) कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनसह आरोग्य यंत्रणा, लोकप्रतिनिधी व इतर यंत्रणांच्या प्रयत्नातून जळगाव जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण दिलासादायक आहे. जिल्ह्यात आजपर्यंत बाधित असलेल्या ९४ हजार ७८२ रुग्णांपैकी ८१ हजार ४२९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात विविध रुग्णालयात ११ हजार ६५६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
आजपर्यंत जिल्ह्यात १ हजार ६७९ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८५.९१ टक्के आहे, तर मृत्युदर १.७९ टक्के इतका खाली आणण्यात आरोग्य यंत्रणेला यश मिळाले आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली आहे.
जळगाव जिल्ह्यात कोरोनाची साळळी खंडित करण्यासाठी बाधित आढळणाऱ्या रुग्णांच्या संपर्कातील तसेच शोध मोहिमेतंर्गत कोरोनाची लक्षणे दिसून येणाऱ्या संशयितांचे स्वॅब घेऊन कोरोना चाचणी करण्यात येत आहे. जिल्ह्यात आजपर्यंत ६ लाख ८२ हजार ९१८ संशयितांचे स्वॅब तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून त्यापैकी ९४ हजार ७८२ अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत तर ५ लाख ८६ हजार १४४ अहवाल निगेटिव्ह आले असून सध्या अवघे ५५६ अहवाल प्रलंबित आहेत. जिल्ह्यात ७ हजार ७८८ व्यक्ति होम क्वारंटाईन असून ५१४ व्यक्ति विलगीकरण कक्षात आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात विविध रुग्णालयात उपचार घेत असलेल्या 11 हजार 656 रुग्णांपैकी 9 हजार 18 रुग्ण लक्षणे नसलेले तर 2 हजार 638 रुग्ण हे लक्षणे असलेली आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी दिली आहे.