जळगाव(प्रतिनिधी) : पैसे जर दिले नाही तर मी तुला धंदा करू देणार नाही, असे म्हणत एकाने चॉपरचा धाक दाखवून मेडिकल चालकाला लुटल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी मेडिकल चालकाने शुक्रवारी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर गुन्हा दाखल झाला आहे.
दादावाडी येथील बाळासाहेब लक्ष्मण पाटील यांचे गेंदालाल मिल येथे रामकृष्ण मेडिकल नावाचे औषधींचे दुकान आहे. बुधवारी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास मेडिकलवर अजीज खान बाबुखान पठाण (रा. गेंदालाल मिल) हा आला आणि तुला तुझे दुकान चालवायचे असेल तर मला पाच हजार रूपये महिना द्यावा लागेल, अशी श्री. पाटील यांना धमकी दिली. मात्र, पाटील यांनी पैसे देण्यास नकार दिल्यावर अजीज खान याने कमरेला लावलेला चॉपर काउंटरवर ठेवून पैसे जर मला दिले नाही तर मी तुला धंदा करू देणार नाही, असे म्हणत पाटील यांना चापटाबुक्क्यांनी मारहाण करायला सुरुवात केली. त्यानंतर दुकानाच्या गल्ल्यातून अजीज खान याने साडेआठ हजार रूपयांची रोकड जबरीने काढून घेतली. मारहाण झाल्यामुळे पाटील हे जखमी झाले होते. उपचारानंतर त्यांनी शुक्रवारी शहर पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दिली. त्यानुसार अजीज खान याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, शुक्रवारी शहर पोलीस ठाण्यातील एपीआय संदीप परदेशी, ओमप्रकाश सोनी, प्रफुल्ल धांडे, राजकुमार चव्हाण, रतन गिते, विजय निकुंभ आदींनी गेंदालाल मिल गाठून संशयित अजीज खान याला अटक केली आहे.