राजस्थान (वृत्तसंस्था) राजस्थानच्या पाली जिल्ह्यात भीषण अपघात झाला असून त्यात ७ भाविकांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात २५ हून अधिक जण जखमी झाले आहेत. अपघातातील मृतांचा आकडाही वाढण्याची शक्यता आहे. सुमेरपूर पोलीस स्टेशन परिसरात रात्री ९ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.
यात्रेकरू ट्रॅक्टर ट्रॉलीतून जैसलमेर जिल्ह्यातील रामदेवरा मंदिरात दर्शनासाठी जात होते. मात्र सुमेरपूरजवळ भाविकांवर काळाने झडप घातली. भरधाव वेगात आलेल्या ट्रॉलीने ट्रॅक्टरला धडक दिली. हा अपघात एवढा भीषण होता की यात सात जणांचा जागीच मृत्यू झाला. खमींना शिवपूर आणि सुमेरपूर शहरातील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघातात बळी पडलेले सर्व भाविक गुजरातमधील बनासकांठा जिल्ह्यातील रहिवासी आहेत.
पंतप्रधान कार्यालयानेही या अपघातावर शोक व्यक्त केला आहे. पीपंतप्रधान कार्यालयाने एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, राजस्थानमधील पाली येथे झालेला अपघात हृदय पिळवटून टाकणारा आहे. या दु:खाच्या प्रसंगी आमच्या शोकसंवेदना शोकाकुल कुटुंबांसोबत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जखमींच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली आहे. केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी या अपघातावर शोक व्यक्त केला आहे. पाली जिल्ह्यातील रामदेवरा येथे दर्शनासाठी जाणाऱ्या अनेक भाविकांचा रस्ता अपघातात मृत्यू झाल्याची बातमी दुःखद असल्याचे त्यांनी ट्विट केले आहे.