चोपडा (प्रतिनिधी) निपुण भारत अभियान अंतर्गत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व मुख्याधिकारी अंकित यांनी जिल्हाभरात विद्यार्थ्याना गणित विषयाची भिती कमी व्हावी व विद्यार्थी अंकगणित मधिल क्षमता कौशल्य विकसित व्हावे यासाठी विविध प्रकारच्या संकल्पना स्पष्ट व्हाव्या या उद्देशाने ‘गणितासाठी दहा दिवस’ या उपक्रमाचे 10 ते 20 ऑक्टोबर या कालावधीत केले आहे. उपक्रमाची विद्यार्थ्यांना गोडी देखील लागली आहे.
वर्गनिहाय जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था जळगाव मार्फत विषयाचे मुलभूत क्षमता नियोजन व आराखडा करून अंमलबजावणी करण्यात आली. यामध्ये पंकज प्राथमिक विद्यालयात इयत्ता चौथी वर्गांतील विद्यार्थ्याना गणित विषयाचे आकलन स्पष्ट होण्यासाठी नियमित विविध भाग रंजक पद्धतीने स्पष्ट करून प्रात्यक्षिक घेण्यात आली. यामध्ये चार व पाच अंकी संख्या वाचन, संख्यालेखन, संख्यांचा चढता व उतरता क्रम, सम विषम संख्या, संख्यांची स्थानिक किंमत, भौमितिक आकार ओळख, बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार यांच्या क्रिया, आकृती रेखाटन सराव इत्यादी अनेक मूलभूत क्रियांचा सराव विषय शिक्षक दिलीप जैस्वाल गणितीय संख्या वाचन विषयी साहित्य तयार करून प्रभावीपणे वापर करून घेतला. मुख्याध्यापक एम व्ही पाटील यांनी सदरील उपक्रमाचे निरीक्षण केले व विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करून कौतुक केले.यासाठी सहकारी शिक्षक श्री मनोज अहिरे व प्रियंका पाटील यांचे सहकार्य लाभले.