नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत चढउतार पाहायला मिळत आहेत. गेल्या २४ तासांत देशात १८ हजार ८७० नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर ३७८ कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले.
देशात गेल्या २४ तासांत १८ हजार ८७० कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. त्यामुळे, देशातील एकूण करोना रुग्णांचा आकडा आता ३ कोटी ३७ लाख १६ हजार ४५१ वर पोहोचला आहे. याच एक दिवसात कोरोनामुळे ३७८ लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे, आतापर्यंत कोरोनाने झालेल्या मृत्यूंची एकूण संख्या ४ लाख ४७ हजार ७५१ वर पोहोचली आहे.
मंगळवारी ५ राज्यांमध्ये सर्वाधिक कोरोना प्रकरणांची नोंद झाली आहे. त्यापैकी केरळमधील रुग्णसंख्या सर्वाधिक आहे. केरळमध्ये ११ हजार १९६, तमिळनाडूमध्ये १ हजार ६३०, मिझोराममध्ये १ हजार ३८०, आंध्र प्रदेश ७७१ तर पश्चिम बंगालमध्ये ७०८ नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. या पाच राज्यांत कमीतकमी ८३.१२ टक्के नवीन प्रकरणं नोंदवली गेली आहेत. तर त्यापैकी तब्बल ५९.३३ टक्के रुग्णसंख्या एकट्या केरळमध्ये आहे.
राज्यातील स्थिती
राज्यात मंगळवारी २८४४ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली तर ६० रुग्णांचा मृत्यू झाला. काल ३ हजार ०२९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत ६३ लाख ६५ हजार २७७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.२६ टक्के आहे.
















