नवी दिल्ली (वृत्तसंस्था) काही दिवसांपूर्वी देशामध्ये कोरोनाचा धोका वाढला असून रुग्णांची संख्यादेखील वाढत होती. मात्र आता सध्या देशात कोरोनाचा वेग मंदावताना दिसत आहे. गेल्या २४ तासांत ३० हजार ०९३ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर ३७४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या २४ तासांत ३० हजार ०९३ कोरोना रुग्ण आढळले. तर ४५ हजार २५४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ३७४ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सध्या देशात ४ लाख ६ हजार १३० बाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आतापर्यंत देशात ३,११,७४,३२२ कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर ३,०३,५३,७१० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच आतापर्यंत ४,१४,४८२ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
३० ते ४० कोटी लोकांचे लसीकरण
सर्वाना मोफत लस मोहिमेत गेल्या २४ दिवसांत ३०-४० कोटी लोकांचे लसीकरण करण्यात आले असून याउलट आधीच्या काळात १० कोटी लोकांचे लसीकरण करण्यास ८५ दिवस लागले होते असे केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मंडाविया यांनी सांगितले. ते म्हणाले की, कोविड १९ लसीकरणात २१ जूनपासून नवा टप्पा सुरू होत आहे. जास्त लशी उपलब्ध करून मोहीम राबवण्यात येणार असून राज्ये व केंद्रशासित प्रदेशांनी त्याचे योग्य नियोजन करण्याची गरज आहे. केंद्र सरकार खरेदी व पुरवठा करताना ७५ टक्के लशी यापुढील काळात मोफत देणार आहे. भारतात ४०.६० कोटी लोकांचे लसीकरण झाले असल्याचे सोमवारच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे.
राज्यातील स्थिती
राज्यात काल (सोमवारी) ६ हजार १७ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर त्याच्या दुप्पट रुग्ण आज कोरोनामुक्त झाले आहेत. काल राज्यात १३ हजार ५१ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात आतापर्यंत ५९ लाख ९३ हजार ४०१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.३५ टक्के आहे. राज्यातील अॅक्टिव रुग्णसंख्या ही एक लाखाच्या खाली आली आहे. राज्यात सध्या ९६ हजार ३७५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.