नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशात कोरोनाची दुसऱ्या लाटेच्या प्रादुर्भावात घट झाली असली तरी धोका अद्याप टळलेला नाही. ऑगस्ट महिन्यात नव्या कोरोनाबाधितांच्या आकड्यात वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या २४ तासांत ४४ हजार ६४३ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. कालच्या दिवसात ४६४ कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले.
आरोग्यमंत्रालया मार्फत देण्यात आलेल्या माहितीनुसार, देशात ४४ हजार ६४३ नवे कोरोनाबाधित आढळले असून, ४१ हजार ०९६ रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. याशिवाय, ४६४ कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. देशात अॅक्टीव्ह रूग्णसंख्या ४,१४,१५९ असून, एकूण ३,१०,१५,८४४ रूग्ण कोरोनातून बरे झालेले आहेत. तसेच, ४९,५३,२७,५९५ जणांचे लसीकरण झालेले आहे.
राज्यातील स्थिती
राज्यात काल (गुरुवारी) ६ हजार ६९५ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ७ हजार १२० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत ६१ लाख १७ हजार ५६० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.६६ टक्के झाले आहे. राज्यात काल (गुरुवारी) कोरोनामुळे १२० रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर २.१ टक्के झाला आहे. तब्बल ३४ महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये आज एकही मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात सध्या ७४ हजार ९९५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
१३५ देशांत डेल्टाचा कहर
तर, कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटचा प्रसार जगातील १३५ देशांमध्ये झाला आहे. हा व्हेरिएंट सर्वप्रथम भारतात आढळला होता. पुढच्या आठवड्यात जगभरातील कोरोना रुग्णांची संख्या २० कोटी पार करेल, असं जागतिक आरोग्य संघटनेनं ३ ऑगस्ट रोजी जारी केलेल्या साप्ताहिक कोरोना अपडेटमध्ये म्हटलंय. जागतिक स्तरावर १३२ देशांमध्ये बीटा व्हेरिएंट आणि ८१ देशांमध्ये गामा व्हेरिएंटची प्रकरणं नोंदवली गेली आहेत. तर, अल्फा व्हेरिएंट १८२ देशांमध्ये पसरला आहे.