नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत आहे. गेल्या २४ तासात आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत पाच हजारांनी घट झाली आहे. गेल्या २४ तासांत ६२ हजार ४८० नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर १ हजार ५८७ कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, देशातल्या नवबाधितांची, मृतांची संख्या हेच सांगतेय. अद्यापही कोरोनाचा धोका कायम असला तरीही कमी होणारी संख्या ही आशादायी बाब आहे. गेल्या ७३ दिवसांत प्रथमच काल दिवसभरातल्या उपचाराधीन रुग्णांची संख्या आठ लाखांच्या खाली आली आहे. देशात गेल्या २४ तासांत ६२ हजार ४८० नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. त्यामुळे उपचाराधीन रुग्णांची संख्या सात लाख ९८ हजार ६५६ वर पोहोचली आहे. आत्तापर्यंत ही संख्या कायम आठ लाखांच्या वरच होती. मात्र, गेल्या ७३ दिवसांत पहिल्यांदाच या संख्येत घट झाल्याचं दिसून येत आहे. तर काल दिवसभरात ८८हजार ९७७ रुग्ण कोरोनामुक्त झाले. त्यामुळे कोरोनामुक्तांची एकूण संख्या आता दोन कोटी ८५ लाख ८० हजार ७४७ वर पोहोचली आहे. गेल्या २४ तासात देशातल्या १ हजार ५८७ बाधितांचा मृत्यू झाला. त्यामुळे देशातल्या मृतांची एकूण संख्या आता तीन लाख ८३ हजार ४९० वर पोहोचली आहे.
देशात गेल्या २४ तासात ३२ लाख ५९ हजार ३ लाभार्थ्यांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली. त्यापैकी पहिला डोस २८ लाख ५४ हजार २२० नागरिकांनी घेतला. तर चार लाख ४ हजार ७८३ जणांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस घेतला आहे. त्यामुळे लसीकरण झालेल्या एकूण नागरिकांची संख्या आता २६ कोटी ८९ लाख ६० हजार ३९९ वर पोहोचली आहे.
राज्यातील स्थिती
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव काही दिवसांपासून कमी होत असलेला दिसून येत आहे. गुरुवारी ९,८३० नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर ५,८९० कोरोनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच २३६ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यात आज एकूण १,३९,९६० ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. आजपर्यंत एकूण ५६,८५,६३६ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत.