मुंबई (वृत्तसंस्था) भाजपचे खासदार सुजय विखे (BJP MP Sujay Vikhe) यांची महाविकास आघाडी सरकारवर बोचरी टीका केली आहे. ‘महाविकास आघाडीचा संसार हा राष्ट्रवादी-शिवसेनेच्या लग्नाप्रमाणे आहे. यामध्ये राष्ट्रवादी ही नवऱ्याच्या भूमिकेत आहे. तर शिवसेना ही मूक बायकोच्या भूमिकेत आहे. तर काँग्रेस हे लग्नात आलेले बिनबुलाए वऱ्हाडी आहेत. त्यांना कितीही बोललं तरी ते जेवणाचं ताट सोडायला तयार नाहीत, अशी बोचरी टीका भाजप खासदार सुजय विखे यांनी केली आहे.
चोरी केली नसेल, तर घाबरायचं कारण नाही, असं म्हणत सुजय विखे पाटील यांनी टीका केली आहे. “आम्ही तर त्यांना चोऱ्या करायला लावल्या नव्हत्या. त्यांनी चोऱ्या केल्या, भ्रष्टाचार केला, पैसे खाल्ले..देशात सत्तेचा वापर कुणी जास्त केला आहे, हे आणीबाणीच्या काळात देशाच्या जनतेनं पाहिलं आहे. कश्मीर पंडितांवर झालेला अत्याचार देखील जनतेसमोर आला आहे. ज्या लोकांनी पैसे खाऊन कारखाने बांधले, संस्था केल्या हा गरीब जनतेचा पैसा नव्हता का?” असा सवाल सुजय विखे पाटील यांनी केला आहे.
“ज्याचं मन साफ असेल, त्यानं भीती बाळगू नये. जर एखाद्यानं चोरी केलीच नसेल, तर घाबरायचं कारण नाही. का प्रत्येकजण दररोज टीव्हीवर बोलतोय? एकही मंत्री कागदपत्र सादर करून म्हणत नाही की आम्ही स्वच्छ आहोत. तुम्ही चोऱ्या केल्या असतील, तर तुम्हाला पकडायचं नाही असा तर नियम नाहीये ना? देश पंतप्रधानांचं घर आहे. ते चौकीदार या नात्याने चोरांना पकडतील अशी अपेक्षा मला आहे”, असं सुजय विखे पाटील म्हणाले.
आघाडीचा संसार म्हणजे नवरा, बायको आणि…
दरम्यान, यावेळी बोलताना सुजय विखे पाटील यांनी महाविकास आघाडीला नवरा, बायको आणि वरातींची उपमा देऊन खोचक टोला लगावला आहे. “महाविकास आघाडीचा संसार असा आहे, की यात लग्न राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं आहे. राष्ट्रवादी नवऱ्याच्या भूमिकेत आहे. त्यानं काहीही मनमानी करावी, त्याला कुणी काही बोलत नाही. शिवसेना एका मुक्या बायकोसारखी आहे, जिला बोलता येत नाही. आणि काँग्रेसवाले वराती आहेत. ज्यांना लग्नाची पत्रिका नव्हती, पण ते बिन बुलाए जेवायला गेले आहेत. त्यांना लाज नाहीये. ते जेवायचं ताटही सोडत नाहीयेत. त्यांना हाणलं तर खाली बसून जेवतील पण ते लग्नाचं फुकट जेवण सोडायला तयार नाहीत. नवरा मस्त मजा करतोय. ही मूक बायको, तिला झालेला त्रास सहन करायचा आहे. सवत जर आणली तर माझं काय. म्हणून ते मूक बायकोच्या भूमिकेत आहेत”, असं सुजय विखे पाटील म्हणाले आहेत.